देहेणची उत्पादने जाणार युरोप, कॅनडा, अमेरिकेच्या बाजारात
By Admin | Updated: February 2, 2015 00:02 IST2015-02-01T22:30:22+5:302015-02-02T00:02:11+5:30
वनौषधी प्रकल्प : ३५ एकरवरील प्रकल्पाला परदेशी पाहुण्यांची भेट

देहेणची उत्पादने जाणार युरोप, कॅनडा, अमेरिकेच्या बाजारात
दापोली : कोकणातील शेतकऱ्याने केवळ भात, आंबा, काजू यावर अवलंबून न राहता वनौषधी शेती केल्यास एकरी लाखो रुपये मिळू शकतात, असा हा वनौषधीचा प्रोजेक्ट लक्ष्मीकांत व रमाकांत हरलालका यांनी ३५ एकरवर उभा केला आहे. त्यांच्या या वनौषधी प्रकल्पाला युरोप, कॅनडा येथील उद्योजकांनी भेट दिली असून, कोकणातील हर्बल प्रोडक्टला विदेशात मोठे मार्केट उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे. देहेण- सुकोंडी येथे लक्ष्मीकांत हरलालका या शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणावर चंदन लागवड केली आहे. चंदनाचे फायदे मानवी जीवनात खूप आहेत. चंदनापासून तेल काढून परदेशात पाठविल्यास चांगली बाजारपेठही उपलब्ध होऊ शकते. चंदनाप्रमाणेच अगरउड, दालचिनी, लेमन ग्रास, पचोली, सालऊड यांसारख्या वनौषधींची लागवड करण्यात आली आहे. हरलालका या शेतकऱ्याने देहेन येथे ३५ एकर शेतीमध्ये चंदन, सोनचाफा, काजू, आंबा याचीही लागवड केली आहे. कोकणातील वनौषधीपासून उत्पादने बनवून थेट विदेशी मार्केटमध्ये पाठविण्याचे धाडस या शेतकऱ्याने केले आहे. ३० एकर जमिनीवरील चंदन लागवडीमध्ये तुरीची लागवड करुन चंदनाला पोषक वातावरणसुध्दा निर्माण करण्यात आले आहे. चंदनाच्या रोपासोबत तूर लागवड केल्यास तुरीच्या झाडापासून नायट्रोजन मिळते. चंदनाचे झाड चांगल्या पध्दतीने वाढायला मदत होते. सेंद्रिय शेतीत चंदनाची लागवड करुन त्या झाडापासून चार वर्षात चंदन मिळायला सुरुवात होते. चंदनाची लागवड कोकणातील शेतीला फार उपयुक्त असून, चंदनाच्या झाडापासून तेल व पॉवर तयार करण्याचे युनिटसुध्दा त्यांनी सुरू केले आहे. त्यामुळे कोकणातील वनौषधीची विविध उत्पादने प्रथमच परदेशी वारी करणार आहेत. कोकणच्या उद्योजकांसाठी ही नक्कीच आशादायी बाब आहे.(प्रतिनिधी)
कोकणातील वनौषधी शेती पाहून खूप आनंद झाला. हे काम खूप चॅलेंजिंग आहे. कॅनडामध्ये मिळणारे प्रोडक्ट एवढे चांगले नसते. इथल्या प्रोडक्टला कॅनडामध्ये खूप मागणी आहे. येथील तेल, झाडे, फुले, सगळं काही उत्कृष्ट आहे.
-विलणीयस, उद्योजक
प्रोसेसिंग युनिटद्वारे साहित्य तयार करुन होणारे उत्पादन थेट परदेशी मार्केटमध्ये पाठविण्यात येत आहे. कोकणातील सेंद्रिय शेतीतील हर्बल उत्पादनाला परदेशात मोठी मागणी असून, किंमतही चांगली येत आहे. विदेशी उद्योजकांनी हर्बल फार्मला भेट देऊन येथील शेतीची पाहणी केली. भविष्यात कोकणातील सर्व नैसर्गिक प्रोडक्टस्ना विदेशी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची ग्वाही यावेळी परदेशी उद्योजकांनी दिली.