वाळूमाफियांवर कारवाईचा बडगा
By Admin | Updated: April 30, 2016 02:51 IST2016-04-30T02:51:58+5:302016-04-30T02:51:58+5:30
तालुक्यातील कुंडलिका नदीकाठी न्हावे, गोफण, शेणवई, भालगाव, यशवंतखार या ठिकाणी वाळूमाफियांनी अक्षरश: हैदोस घातला आहे.

वाळूमाफियांवर कारवाईचा बडगा
रोहा : तालुक्यातील कुंडलिका नदीकाठी न्हावे, गोफण, शेणवई, भालगाव, यशवंतखार या ठिकाणी वाळूमाफियांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. या ठिकाणच्या खाडीतून अनधिकृत वाळू उत्खनन करण्यात येत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविण्यात येत आहे.
गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. अखेर महसूल खात्याला जाग आल्याने तहसीलदार ऊर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विविध ठिकाणी धाडी टाकून सव्वापाच लाखांची वाळू जप्त करण्यात
आली.
रोहे तालुक्यातील अनधिकृत रेती उत्खनन व वाहतुकीला प्रतिबंध करण्यासाठी तहसीलदार ऊर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन तहसीलदार डॉ. अमित मुंडे, पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण साळवे, रोहा मंडळ अधिकारी अरुण गणतांडेल, चणेरा मंडळ अधिकारी अजित घासे, तलाठी सचिन सांबरे, प्रवीण भोईर, रवींद्र बाईत या महसूल व पोलिसांच्या संयुक्त कामगिरीने तालुक्यातील न्हावे, गोफण, शेणवई या खाडीत सुरू असलेल्या अनधिकृत रेती उत्खननावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. महसूल व पोलीस खात्याकडून अचानक झालेल्या कारवाईमुळे वाळूमाफियांची एकच धावपळ उडाली.
तालुक्यातील अनेक ठिकाणी अजूनही अवैधरीत्या वाळू उत्खनन सुरू असून त्यावर कारवाई झालेली नाही. राजकीय वरदहस्तामुळे ही कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्यातील सर्वच नद्यांमध्ये रेती उत्खनन सुरू असून त्यावर नियमित कारवाईची मागणी होत आहे.