साडेतीनशे व्यापाऱ्यांवर मालमत्ता जप्तीची कारवाई
By Admin | Updated: February 21, 2015 00:16 IST2015-02-20T23:36:06+5:302015-02-21T00:16:58+5:30
अजिज कारचे : एलबीटीप्रश्नी कारवाई थांबणार नाही

साडेतीनशे व्यापाऱ्यांवर मालमत्ता जप्तीची कारवाई
सांगली : महापालिकेने गेल्या दोन वर्षापासून व्यापाऱ्यांना एलबीटी भरण्याबाबत वारंवार आवाहन केले आहे, पण त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. नोंदणी व कर न भरणाऱ्या सुमारे ३५० व्यापाऱ्यांना बारा कोटींच्या कराचे मागणीपत्र दिले आहे. लवकरच या व्यापाऱ्यांची मालमत्ता जप्तीची कारवाई हाती घेतली जाणार असल्याचे आयुक्त अजिज कारचे यांनी आज, शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. व्यापाऱ्यांच्या दुकानांवरील छाप्याचे समर्थन करीत मुख्यमंत्र्यांनीही व्यापाऱ्यांना कर भरण्याचे आवाहन केले आहे. पण त्यांनाही ते प्रतिसाद देत नसल्याचे कारचे यांनी सांगितले.
महापालिकेने एलबीटी वसुलीसाठी आज गणपती पेठेतील एका दुकानावर छापा टाकून कागदपत्रे ताब्यात घेतली. या कारवाईनंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्त कारचे म्हणाले की, एलबीटीबाबत प्रशासन कारवाई करीत नाही, असा आरोप नगरसेवक करीत आहेत. वस्तुत: कारवाईची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. वारंवार नोटिसा बजावून सुनावणी घेतली आहे. विक्रीकर विभागाकडे व्यापाऱ्यांनी भरलेल्या परताव्यावरून त्यांच्या उलाढालीचे आकडे निश्चित केले आहेत. त्यानुसार ३५० व्यापाऱ्यांना १२ कोटी रुपये कर भरण्याची नोटीस बजाविली आहे. नोंदणी व कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या उलाढालीवरही लक्ष आहे. हा शेवटचा टप्पा असून नोटिसीची मुदत संपताच मालमत्ता जप्त करून लिलाव काढण्याची प्रक्रिया हाती घेणार आहे.
कारवाईत खंड पडत असल्याच्या आरोपास नकार देत ते म्हणाले की, दूरध्वनीवरून मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर कारवाई थांबविणे भाग आहे. अद्यापपर्यंत शासनाने कोणतेही लेखी आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे आता कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यात कुठलाही खंड पडणार नाही. (प्रतिनिधी)