खासदारांच्या पत्रावर दोन महिन्यांत कार्यवाही
By Admin | Updated: November 21, 2014 02:36 IST2014-11-21T02:36:40+5:302014-11-21T02:36:40+5:30
आम्ही शासनाच्या विविध विभागांना मागणी, सूचनांची पत्रे देतो पण त्यांचे उत्तर देण्याचे सौजन्यही दाखविले जात नाही,

खासदारांच्या पत्रावर दोन महिन्यांत कार्यवाही
मुंबई : आम्ही शासनाच्या विविध विभागांना मागणी, सूचनांची पत्रे देतो पण त्यांचे उत्तर देण्याचे सौजन्यही दाखविले जात नाही, अशी तक्रार राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर, खासदारांच्या पत्रावर काय कार्यवाही शासनाने केली हे त्यांना दोन महिन्यांच्या आत कळविले जाईल, असे आश्वासद फडणवीस यांनी दिले.
राज्यातील खासदारांची मुख्यमंत्र्यासमवेत गुरुवारी बैठक झाली. त्यात अपारंपारिक ऊर्जा, मुंबई उपनगर रेल्वेशी संबंधित प्रश्न, मुंबई विकास योजनेत केंद्राचा निधी मिळणे, परवडणारी घरे, मराठवाड्यातील दुष्काळ, कोल्हापूरला कोकण रेल्वेने जोडणे, अतिरिक्त दुधाचा प्रश्न, कापूस हमी भाव, मेट्रोचे जाळे, आरोग्य यंत्रणा, इंदू मिल जमिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रस्तावित स्मारक, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देणे, कोस्टल रोड अशा प्रश्नांवर चर्चा झाली. महत्त्वाच्या विषयांचा यापुढे गांभीर्याने पाठपुरावा केला जाईल, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियूष गोयल, केंद्रीय खते आणि रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे त्याचप्रमाणे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)