तुर्भेतील रेल्वे यार्डला समस्यांचा विळखा
By Admin | Updated: June 8, 2016 01:58 IST2016-06-08T01:58:45+5:302016-06-08T01:58:45+5:30
रेल्वे प्रशासनाकडे पाच वर्षांपासून पाठपुरावा केल्यानंतरही तुर्भे रेल्वे यार्डमधील रस्ते, धक्क्यावरील शेडचे तुटलेले पत्रे दुरुस्त केले नाहीत

तुर्भेतील रेल्वे यार्डला समस्यांचा विळखा
नामदेव मोरे,
नवी मुंबई- रेल्वे प्रशासनाकडे पाच वर्षांपासून पाठपुरावा केल्यानंतरही तुर्भे रेल्वे यार्डमधील रस्ते, धक्क्यावरील शेडचे तुटलेले पत्रे दुरुस्त केले नाहीत. यामुळे पावसाळ्यामध्ये कोट्यवधींचे सिमेंट, गहू व तांदूळ भिजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वेच्या अनागोंदी कारभाराचा फटका अजून किती वर्षे सहन करायचा, असा प्रश्न माथाडी कामगारांसह व्यावसायिक उपस्थित करू लागले आहेत.
मालवाहतुकीसाठीच्या प्रमुख रेल्वे यार्डमध्ये तुर्भेचा समावेश होतो. सद्य:स्थितीमध्ये प्रत्येक महिन्याला सिमेंट व अन्नधान्याच्या जवळपास ३० ट्रेन येत असतात. आलेला माल माथाडी कामगार धक्क्यावर उतरवून ठेवतात व नंतर तो ट्रकमध्ये भरून निश्चित ठिकाणी पाठविला जातो. याठिकाणी जवळपास एक हजार माथाडी कामगार काम करत आहेत. गत पाच वर्षांपासून रेल्वे यार्डला समस्यांचा विळखा पडला आहे. रोडला खड्डे पडले आहेत. धक्क्यावर मालाची चढ - उतार करण्याच्या ठिकाणचा भाग खचला आहे. पावसाळ्यात धक्क्यावर सर्वत्र गळती होत असल्याने धान्य व सिमेंट भिजून नुकसान होते.
पाच वर्षांपासून कामगार व महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियन सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत असून निधी नसल्याचे कारण सांगून कामे केली जात नाहीत. दोन वर्षांपूर्वी रोडवर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु अर्ध्या रोडचेच काम केले, उर्वरित रोड तसाच ठेवला आहे.
रेल्वे धक्क्यावरील तुटलेले पत्रे बदलण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. तुटलेल्या पत्र्यांमुळे पावसाचे पाणी थेट धक्क्यावर येवून तेथे ठेवलेला माल भिजत आहे. पूर्ण शेडमध्ये गळती होत असल्याने येथे ठेवण्यात येणाऱ्या सिमेंट व अन्नधान्यावर प्लास्टिकचे आवरण टाकावे लागत आहे. पूर्ण यार्ड जलमय झाल्यामुळे कामगारांना गोणी वाहून नेतानाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. कामगारांना सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
>खासदारांनी फिरविली पाठ
ठाणे जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे यार्ड म्हणून तुर्भेची ओळख आहे. ठाणे मतदार संघाचे आतापर्यंतचे सर्वच खासदार रेल्वेच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करत असतात.
प्रकाश परांजपे, आनंद परांजपे, संजीव नाईक व आताचे राजन विचारे सर्वच खासदार वारंवार रेल्वे स्टेशनचे दौरे करत असतात. परंतु आतापर्यंत एकाही खासदाराने तुर्भे रेल्वे यार्डला भेट दिली नाही. विद्यमान खासदार तरी येथील समस्या सोडविणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माथाडी कामगारांना फटका : तुर्भे रेल्वे यार्डमधील गैरसोयींचा सर्वाधिक फटका माथाडी कामगारांना बसू लागला आहे.पावसाळ्यात धक्क्यावर पाणी असल्यामुळे पाय घसरून अनेक कामगार गोणीसह खाली पडल्याच्या घटना घडल्या आहेत. गंभीर दुखापत झाल्याने अनेकांना नोकरी सोडावी लागली आहे. कामगारांचा मृत्यू होईपर्यंत रेल्वे प्रशासन गप्प बसणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.