पृथ्वीराजबाबा रमणार राज्यातच !
By Admin | Updated: November 3, 2014 00:42 IST2014-11-03T00:32:56+5:302014-11-03T00:42:39+5:30
वर्षा बंगल्याचा घेतला निरोप : आता कऱ्हाडसह मुंबईतही संपर्क कार्यालय

पृथ्वीराजबाबा रमणार राज्यातच !
प्रमोद सुकरे - कऱ्हाड -‘दिल्लीचे राजकारण गल्लीत राहून करता येत नाही; पण आता महाराष्ट्राच्या राजकारणात मी रमलो आहे़ मुंबई अन् कऱ्हाडातच राहणार,’ अशी स्पष्टोक्ती देणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यानच कऱ्हाडात संपर्क कार्यालय सुरू केलंय़; तर मुंबईत नवीन घरासह संपर्क कार्यालय सुरू करण्याच्या त्यांच्या हालचाली सुरू आहेत़
सन १९९१ पासून राजकारणात सक्रिय झालेले पृथ्वीराज चव्हाण लोकसभेवर खासदार झाले अन् दिल्लीच्या राजकारणात रममाण झाले़ १९९९ ला राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर याच मतदारसंघात चव्हाण यांचा पराभव झाला; पण राज्यसभेवर निवडून जाऊन त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्रिपदही सांभाळले़
दिल्लीच्या राजकारणात गेलेले पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राच्या राजकारणात कधी सक्रिय होतील अन् रमतील, असे कोणालाच वाटत नव्हते़ मात्र, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रिपद मिळाले. राज्याच्या राजकारणात पृथ्वीराज चव्हाण टिकणार नाहीत, अशी टीका सुरू झाली; पण त्यांनी सुमारे पावणेचार वर्षे मुख्यमंत्रिपद यशस्वीपणे सांभाळले़
त्यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या़ तेव्हा त्यांनी कऱ्हाड दक्षिणेतून निवडणूक लढवली़ त्यावेळी स्वपक्षातील विरोधकांबरोबरच इतर पक्षाच्या नेत्यांनीही हे दिल्लीत राहणार, अशी टीका केली़ मात्र, आता मी महाराष्ट्रातच राहणार असून, कऱ्हाडशी नाळ घट्ट करणार, असे त्यांनी स्पष्ट केले आहे़ याच पार्श्वभूमीवर त्यांनी कऱ्हाडच्या पाटण कॉलनीत आपले प्रशस्त संपर्क कार्यालय सुरू केलेय, तर मुंबईतल्या ‘वर्षा’वरचा त्यांचा मुक्काम आत इतरत्र हलवण्याच्या हालचाली सुरू आहे़ मुंबईत नव्या ठिकाणी ते राहणार असून, तेथेही संपर्क कार्यालय सुरू करणार असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत़
कऱ्हाड तालुक्यासह सातारा ुजिल्ह्याच्या विविध भागातून कार्यकर्ते, पदाधिकारी नेहमी मुंबईला विविध कामासाठी जात असतात. मुंबईत त्यांनी संपर्क कार्यालय सुरू केल्यास त्यांची भेट घेणे सोपे जाणार आहे.
चारही सभागृहांत काम करण्याची संधी
पृथ्वीराज चव्हाण यांनी सुरुवातीला लोकसभेत काम केले़ त्यानंतर राज्यसभेवर जाऊन पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री बनले़ चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी टाकली अन् ते विधानपरिषदेचे सदस्य झाले़ नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मताधिक्याने यश मिळविल्याने त्यांना चारही सभागृहांत काम करण्याची संधी मिळाल्याची चर्चा आहे़
‘वर्षा’वरील साहित्य कऱ्हाडात
गेले पावणेचार वर्षे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुंबईत ‘वर्षा’वर राहत होते़ भाजप सरकार सत्तेत आल्याने, हे शासकीय निवासस्थान खाली करण्याचे काम वेगात सुरू आहे़ शुक्रवारपासून ‘वर्षा’वरील साहित्य घेऊन काही वाहने कऱ्हाडातील त्यांच्या निवासस्थानी आल्याचे पाहावयास मिळत आहे़
दोन्ही ठिकाणी नेमणार खासगी सचिव
पृथ्वीराज चव्हाण १९९१ मध्ये पहिल्यांदा कऱ्हाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले़ त्यावेळेपासून गजानन आवळकर हे त्यांचे खासगी सचिव राहिले आहेत़ १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते राज्यसभेवर गेले़ अन् काही काळ पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्रिपद त्यांनी सांभाळले़ दिल्लीत अनेक शासकीय पी़ ए़ त्यांच्या हाताखाली आले़ चार वर्षांपूर्वी ते राज्याचे मुख्यमंत्री झाले; त्यावेळी तीन ओ़ एस़ डी़, तीन पी़ एस़ अन् सात पी़ ए़ यांना बरोबर घेऊन त्यांनी राज्याचा कारभार सुलभ हाताळण्याचा प्रयत्न केला़ सध्या मात्र त्यांच्याकडे कोणतेच पद दिसत नाही़ त्यामुळे जनाधार मिळविलेले पृथ्वीराज कऱ्हाड अन् मुंबई अशा दोन्ही ठिकाणी स्वतंत्र खासगी सचिव ठेवतील, अशी चर्चा आहे़