कैद्यांचा एक दिवस कुटुंबासोबत !
By Admin | Updated: July 9, 2016 04:02 IST2016-07-09T04:02:19+5:302016-07-09T04:02:19+5:30
कधी किरकोळ रागामधून, कधी ठरवून, कधी अजाणतेपणी तर कधी नाईलाज म्हणून हातून घडलेला गुन्हा भली मोठी शिक्षा भोगायला लावतो. उभं तारुण्य कारागृहांच्या भिंतीआड सरून जातं.

कैद्यांचा एक दिवस कुटुंबासोबत !
- लक्ष्मण मोरे, पुणे
कधी किरकोळ रागामधून, कधी ठरवून, कधी अजाणतेपणी तर कधी नाईलाज म्हणून हातून घडलेला गुन्हा भली मोठी शिक्षा भोगायला लावतो. उभं तारुण्य कारागृहांच्या भिंतीआड सरून जातं. आई-वडील, भाऊ-बहीण, पत्नी-मुले सर्व काही दुरावते. परिवारापासून दूर राहण्याचं दु:ख उराशी बाळगत कैदी एकेक दिवस मोजत आयुष्य जगत असतात. या बंदी बांधवांच्या आयुष्यामध्ये बदलाची पहाट आणण्यासाठी कारागृह विभाग गेल्या काही महिन्यांपासून विविध उपक्रम राबवीत आहे. त्यांच्यातील परिवर्तन प्रक्रियेचा एक भाग म्हणून बंदीजनांना लवकरच एक संपूर्ण दिवस कुटुंबासोबत घालविण्याची संधी मिळणार आहे. एरवी जाळीआडून एकमेकांशी बोलणारे नातेवाईक या कैद्यांना प्रत्यक्ष समोरासमोर भेटून एकत्र जेवण घेऊ शकणार आहेत. आपल्या मुलाबाळांसोबत काही तास का होईना; मात्र खेळू बागडू शकणार आहेत.
राज्याच्या कारागृह विभागाचे महानिरीक्षक तथा अतिरिक्त महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेमधून लवकरच हा पथदर्शी प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्यासाठी कारागृह विभागाला पुण्यातील काही सामाजिक संस्था यथाशक्ती मदत करीत आहेत. डॉ. मिलिंद भोई यांचे शंकरराव भोई प्रतिष्ठान, सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांचे आदर्श मित्रमंडळ यांच्या सहकार्याने येरवडा कारागृहात कैद्यांसाठी गेल्या वर्षभरापासून ‘प्रेरणापथ’ ही व्याख्यानमाला चालविली जात आहे. कैद्यांसमोर प्रख्यात शास्त्रज्ञ, वकील, अभ्यासक, लेखक, उद्योजक यांची भाषणे झाली आहेत. कैद्यांनी या कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवनामधून बोध घेऊन आयुष्य सुधारावे, अशी संकल्पना त्यामागे आहे.
कैद्यांना सुधारण्याची संधी देणे आणि समाजात त्यांचे पुनर्वसन करणे ही काळाची गरज आहे. शेवटी एखाद्या चुकीसाठी आयुष्यभर कारागृहाच्या भिंतीआड गेलेली ‘माणसं’च आहेत. कारागृहातले दैनंदिन व्यवहार, कामकाज आणि शिक्षा भोगताना अनेक कैदी पश्चात्तापामुळे ढसाढसा रडत असतात. त्यांना कुटुंबाला भेटायची इच्छा होत राहते. गर्दीमध्ये राहत असले तरी सर्व जण तसे ‘एकटे’च असतात. कुटुंबीय भेटायला आले तरी मध्ये जाळी असते. दूरूनच मोजके बोलावे लागते. वेळेच्या मर्यादेमुळे एकमेकांना नीट भेटता आणि बोलताही येत नाही.
शिक्षा भोगायला येताना घरामध्ये लहानग्याला सोडून आलेला कैदी घरी परत जातो तेव्हा मुले मोठी झालेली असतात. त्यांच्यामध्ये एक अदृश्य असे अंतर पडलेले असते. आपल्या परिवाराला भेटण्याची कैद्यांची इच्छा आता पूर्णत्वास येणार आहे. दर महिन्याला काही कैदी निवडून त्यांची थेट परिवारासोबतच भेट घालून देण्यात येणार आहे.
शिक्षा भोगत असताना चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांच्या पत्नी, मुले यांना एक दिवस भेटण्याची योजना कारागृह विभाग सुरू करणार आहे. येत्या आठवडाभरात तब्बल २०० कैद्यांना त्यांच्या पत्नी व मुलांना भेटवण्यात येणार आहे. हे कैदी त्यांच्या घरचे जेवण परिवारासोबत बसून जेवतील.
सर्व जणांना एकाच मोठ्या हॉलमध्ये एकत्र करून तेथेच सर्व जण भेटतील. बराच काळ दूर राहिलेल्या ‘माणसांची’ भेट यानिमित्ताने घडवून आणण्याच्या प्रयत्नामागे कैद्यांमध्ये सुधारणा व्हावी आणि त्यांचे मतपरिवर्तन व्हावे, हा हेतू आहे. -