कारागृहातून जन्मठेपेचा कैदी पळाला
By Admin | Updated: September 18, 2014 00:50 IST2014-09-18T00:50:35+5:302014-09-18T00:50:35+5:30
मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास पलायन केले. या घटनेने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.

कारागृहातून जन्मठेपेचा कैदी पळाला
प्रशासनात खळबळ
नागपूर : मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास पलायन केले. या घटनेने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.
सूरज श्याम अरखेल, असे या कैद्याचे नाव असून तो वर्धेचा रहिवासी आहे. या कैद्याच्या पलायनामागील कारण मोबाईल असल्याचे कळते. काल रात्री कारागृह अधिकाऱ्यांनी धाड घातली असता त्यांना सूरज अरखेल याच्याजवळ मोबाईल आढळला होता. मोबाईल जप्त करण्यात आला होता. सूरजने अधिकाऱ्यांना विनवणी करून मोबाईल जप्त करा परंतु सिम कार्ड देऊन टाका, असे म्हटले होते. आपले सिमकार्ड परत मिळाले नाही तर जेलमधून पळून जाण्याची धमकीही त्याने दिली होती. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याने त्याला जबरदस्त मारहाण केली होती, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. सूरज अरखेल हा दोन हजार रुपये हप्ता देऊन कारागृहातून मोबाईलचा वापर करीत होता, असेही कळते. रविवारच्या रात्रीही कारागृहातील बड्या गोलमध्ये कारागृह अधिकाऱ्यांनी धाड घालून कैद्यांजवळून १२ मोबाईल जप्त केले होते, असेही सांगितले जाते.
कडेकोट सुरक्षा घेरा असताना आणि पळून जाण्याची धमकी दिली असताना हा कैदी आज कारागृहातून कसा काय पळाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या कैद्याने कारागृहात कधीही न परतण्याची शपथ घेत आपल्या एका प्रेयसीसोबत पलायन केल्याचेही कळते. (प्रतिनिधी)