गुजरातच्या गुरांना महाराष्ट्रात बंदी
By Admin | Updated: February 10, 2015 02:33 IST2015-02-10T02:33:49+5:302015-02-10T02:33:49+5:30
महाराष्ट्रातील टंचाईग्रस्त गावांची संख्या १८ हजारांवरून २४ हजार एवढी वाढल्याने राज्यातील चारा बाहेरील राज्यांत घेऊन जाण्यावर बंदी

गुजरातच्या गुरांना महाराष्ट्रात बंदी
मुंबई : महाराष्ट्रातील टंचाईग्रस्त गावांची संख्या १८ हजारांवरून २४ हजार एवढी वाढल्याने राज्यातील चारा बाहेरील राज्यांत घेऊन जाण्यावर बंदी घालताना गुजरात राज्यातून काठेवाडी समाजासोबत येणाऱ्या गुरांवर बंदी घातली आहे. याची अंमलबजावणी या महिन्यापासून सुरू झाली आहे.
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले की, राज्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मराठवाड्यात परिस्थिती दिवसागणिक भीषण होण्याची चिन्हे दिसत आहेत. गुजरातमधून दरवर्षी लक्षावधी गुरेढोरे चाऱ्याच्या शोधात महाराष्ट्रात येतात. यंदा उन्हाळ््यात महाराष्ट्रात चाऱ्याची टंचाई जाणवेल अशी स्थिती असल्याने हा निर्णय घेतला आहे. महसूल विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याची आकडेवारी समोर आल्याने खात्याचे प्रधान सचिव व सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव यांना या समस्येचे मूळ शोधण्यास सांगितले होते. महसूल खात्यातील ७० टक्के भ्रष्टाचार तलाठी व सर्कल स्तरावर होत असल्याचे आढळून आले. सातबाराचे उतारे देताना किंवा नोंदीची फेरफार करताना भ्रष्टाचार होत असल्याने सातबारा उतारे सही-शिक्क्यासह आॅनलाईन देण्यास सुरुवात केली आहे. नोंदींच्या फेरफारीकरिता इ-फेरफार करण्याची योजना लागू केली असून लवकरच ती ९० टक्के तालुक्यांत अमलात आणली जाईल, असे खडसे यांनी सांगितले. यामुळे येत्या काही दिवसांत महसूल खात्यामधील भ्रष्टाचार आटोक्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खात्यामधील बदल्याचे अधिकार विकेंद्रीत केले असल्याचेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)