कैद्यांकडेच तुरुंगाची रखवाली
By Admin | Updated: April 7, 2015 04:56 IST2015-04-07T04:56:11+5:302015-04-07T04:56:11+5:30
राज्यातील अनेक खुल्या व जिल्हा कारागृहांत सुरक्षेसाठी रात्रीचे पहारेकरी म्हणून कैद्यांची नियुक्ती करण्यात येत असून, सध्या विविध कारागृहांत ४१२ कैदी पहारेकरी

कैद्यांकडेच तुरुंगाची रखवाली
नीलेश शहाकार, बुलडाणा
राज्यातील अनेक खुल्या व जिल्हा कारागृहांत सुरक्षेसाठी रात्रीचे पहारेकरी म्हणून कैद्यांची नियुक्ती करण्यात येत असून, सध्या विविध कारागृहांत ४१२ कैदी पहारेकरी म्हणून काम करीत आहेत़ त्यामुळे कारागृहांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पाच खतरनाक कैदी पळून जाण्याची घटना गेल्या आठवड्यात घडली़ त्यानंतर कारागृहाच्या सुरक्षेचे हे वास्तव समोर आले आहे़
कारागृहांमध्ये कैद्यांना विविध व्यवसायाभिमुख उद्योगांत गुंतविण्यात येते. तर ज्या कैद्यांना अक्षरओळख नसते, त्यांच्याकडे कारागृहात रात्र पहारेकरी, स्वच्छता, कारागृह दुरुस्ती, स्वयंपाक अशी कामे सोपवण्यात येतात. या विविध कामांसाठी राज्यातील मध्यवर्ती, खुल्या आणि जिल्हा अशा ४७ कारागृहांत सध्या १,५५८ कैद्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षेसाठी प्रत्येक कारागृहात पोलीस कर्मचारी तैनात असतात. मात्र कारागृहात असणाऱ्या ज्या सेल (वार्ड) मध्ये सदोष कैद्यांना ठेवले जाते, त्या विस्तारित वार्डाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पहारेकरी म्हणून ज्येष्ठ कैद्याची नियुक्ती करण्यात येते. मात्र या कैदी पहारेदारांची विश्वनीयता संपुष्टात आली तर कारागृहांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.