४८ तासांत निकाल, विनयभंग करणारा तुरुंगात

By Admin | Updated: January 12, 2017 02:26 IST2017-01-12T02:26:37+5:302017-01-12T02:26:37+5:30

मोबाईलवरून अश्लील एसएमएस पाठवून विनयभंग करणाऱ्या व एकतर्फी प्रेमाची मागणी करणाऱ्या युवकाला

Prison in 48 hours, molestation prison | ४८ तासांत निकाल, विनयभंग करणारा तुरुंगात

४८ तासांत निकाल, विनयभंग करणारा तुरुंगात

राजगुरुनगर : मोबाईलवरून अश्लील एसएमएस पाठवून विनयभंग करणाऱ्या व एकतर्फी प्रेमाची मागणी करणाऱ्या युवकाला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय. जे. तांबोळी यांनी दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. विशेष बाब म्हणजे खटला दाखल झाल्यानंतर सलग सुनावणी होऊन दोन दिवसांतच निकाल देण्यात आला.
अतुल गणेश पाटील (वय ३०, रा. नाणेकरवाडी, चाकण, मूळ गाव शेलापूर, मुताळा, जि. बुलढाणा) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. चाकण येथील एका कंपनीमध्ये आरोपी सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. त्याच कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करणाऱ्या २२ वर्षीय युवतीला आरोपीने तीन वेगवेगळ्या सिमकार्डवरून अश्लील एसएमएस पाठवले.
२८ डिसेंबर २०१६ ते १ जानेवारी २०१७ दरम्यान एसएमस पाठविण्यात आले. तसेच अनेकदा संपर्क करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. अनोळखी क्रमांक पाहून या युवतीने एक जानेवारीला चाकण पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोबाईल कॉल्सचा तपशील काढून आरोपीला सोमवारी (ता. ९) अटक करून त्याच दिवशी त्याला न्यायालयात हजर केले. पीडित युवतीला आलेले एसएमएस, कॉल्स व आरोपीच्या रूम पार्टनरने दिलेली साक्ष व पोलिसांनी दिलेल्या माहितीचा विचार करून न्या. तांबोळी यांनी आज (दि. ११) दुपारी बारा वाजता आरोपीला दोन वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना शिक्षा सुनावली.

Web Title: Prison in 48 hours, molestation prison