आचारसंहितेआधीच प्रचाराची धामधूम
By Admin | Updated: February 2, 2015 04:44 IST2015-02-02T04:44:59+5:302015-02-02T04:44:59+5:30
बदलापूर पालिकेच्या निवडणुका एप्रिलमध्ये होणार असल्या तरी या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढण्यासाठी भाजपा व शिवसेनेने जय्यत तयारी सुरू केली आहे

आचारसंहितेआधीच प्रचाराची धामधूम
पंकज पाटील, बदलापूर
बदलापूर पालिकेच्या निवडणुका एप्रिलमध्ये होणार असल्या तरी या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढण्यासाठी भाजपा व शिवसेनेने जय्यत तयारी सुरू केली आहे. भाजपाने ‘आमदार आपल्या दारी’ हे अभियान राबवित मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. तर शिवसेनेने कार्यकर्ता मेळाव्यातून कार्यकर्त्यांना संघटित करण्याचे काम सुरू केले आहे.
कुळगाव-बदलापूर नगर परिषद निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत निघाल्यावर आता इच्छुकांनी आपले प्रभाग निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे निवडणुकीआधीच वातावरणनिर्मिती करण्यासाठी दोन प्रमुख पक्ष कामाला लागले आहेत. बदलापुरात शिवसेना आणि भाजपामध्येच खरी लढत असल्याने या दोन पक्षांनी कंबर कसली आहे. आचारसंहिता लागू झाल्यावर प्रचाराला मर्यादा येणार असल्याने भाजपाने आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे काम सुरू केले आहे. आमदार आपल्या दारी या मोहिमेअंतर्गत भाजपाने आपला प्रचार सुरू केला आहे. प्रत्येक प्रभागनिहाय हा प्रचार होत आहे.
दुसरीकडे शिवसेनेने आपली ताकद आणि सत्ता अबाधित ठेवण्यासाठी शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली तयारी सुरू केली आहे. कार्यकर्ता मेळावा, पक्ष कार्यालय उभारणे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बदलापूर महोत्सवाच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रत्येक प्रभागात पक्षाचे प्रचार कार्यालय उभारण्यात येत आहे. राष्ट्रवादी कमकुवत दिसत असली तरी पक्ष जिवंत ठेवण्याचा प्रयत्न शहर प्रमुख कालीदास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. पालिकेच्या धोरणांविरोधात मोर्चे काढून मतदारांना जागृत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मनसे, काँग्रेस प्रचारात कुठेच दिसत नाही. (प्रतिनिधी)