शेळोलीत गोळ्यांच्या कारखान्यावर छापा
By Admin | Updated: April 22, 2015 00:52 IST2015-04-22T00:47:15+5:302015-04-22T00:52:59+5:30
प्रांताधिकाऱ्यांची कारवाई : मातीच्या गोळ्या परदेशात पाठवित असल्याची माहिती उघड

शेळोलीत गोळ्यांच्या कारखान्यावर छापा
गारगोटी : शेळोली (ता. भुदरगड) येथे पांढऱ्या मातीच्या गोळ्या (शाडू) बनविण्याच्या आनुकेम इंडस्ट्रीज या कारखान्यावर भुदरगडच्या प्रांताधिकारी कीर्ती नलवडे यांनी धाड टाकून कारवाई केली. यावेळी येथे बनविलेल्या पांढऱ्या मातीच्या (शाडू) गोळ्या परदेशी निर्यात होत असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली. वार्षिक पन्नास कोटींपेक्षा अधिक या कारखान्याची उलाढाल असून, हा कारखाना बेकायदेशीररीत्या सुरू असल्याचे बोलले जात होते.शेळोलीतून पडखंबेकडे जाणाऱ्या डोंगराळ भागात गेली अनेक वषार्पासून पांढऱ्या मातीवर प्रक्रिया करणारा कारखाना सुरू आहे.या कारखान्याबद्दल अनेक वेळा खनिज संपतीची लूट होत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी केल्या होत्या. मात्र, याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले होते. प्रांताधिकारी कीर्ती नलवडे यांच्याकडे याविषयी ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर त्यांनी या कारखान्यावर धाड टाकली असता येथे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. इतका मोठा व्यवसाय एम. आय. डी. सी. सारख्या परिसरात उभारणे आवश्यक असताना हा व्यवसाय गावासाठी राखीव असणाऱ्या गायरानात उभारण्यात आला आहे. याला ग्रामपंचायतीने मान्यता दिली आहे काय? या बेकायदेशीर कारखान्यात तयार होणारा माल परदेशात जात असताना देखील महसूल, पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ, आयकर विभाग या सर्वांनी दुर्लक्ष का केले? यांचा परवाना या कारखान्यास आहे का? असे प्रश्नही येथे उपस्थित होत आहेत. गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या या कारखान्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यावरसुध्दा सीसीटीव्ही वॉच असून, कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला कारखान्याच्या परिसरात फिरकूही दिले जात नाही.
या कारखान्याविषयीच्या अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या गोळ्यांचा वापर नेमका कशासाठी होतो. याविषयी अजून काहीही पुढे आलेले नाही. अधिकाऱ्यांनी या कारखान्यातील कागदपत्रांचीही तपासणी केली. याचा वापर आॅईलमध्ये होत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याच्या नेमक्या वापराविषयी अजून अनभिज्ञता आहे. (प्रतिनिधी)
नागरिकांच्या तक्रारीनंतर आपण या कारखान्यावर गेलो असता येथे अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. या कारखान्याकडे आपण आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची मागणी केली आहे. मात्र, या कंपनीकडून आवश्यक कागदपत्रे अजून मिळालेली नाहीत. त्यामुळे या कंपनीच्या परवानगी विषयीची शंका आहे.
- कीर्ती नलावडे (प्रांताधिकारी भुदरगड-आजरा)