वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या लॉजवर छापा
By Admin | Updated: June 8, 2016 02:04 IST2016-06-08T02:04:44+5:302016-06-08T02:04:44+5:30
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महापे येथील लॉजवर छापा टाकून त्याठिकाणी चालणारा वेश्याव्यवसाय बंद पाडला आहे.

वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या लॉजवर छापा
नवी मुंबई : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महापे येथील लॉजवर छापा टाकून त्याठिकाणी चालणारा वेश्याव्यवसाय बंद पाडला आहे. ग्राहकांना लॉजमध्येच दलालांमार्फत महिला पुरवून हा गैरप्रकार त्याठिकाणी सुरू होता. याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून तिघांना अटक केली आहे.
लॉजमध्ये चालणारे गैरप्रकार कायमस्वरूपी बंद पाडण्याच्या उद्देशाने गुन्हे शाखा पोलिसांनी पाऊल उचलले आहे. त्याकरिता विविध पथकांच्या माध्यमातून शहरातील लॉजची झाडाझडती घेतली जात आहे. यादरम्यान महापे एमआयडीसीमधील वैशाली लॉजमध्ये बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला मिळाली होती. त्याची खात्री पटवण्यासाठी सोमवारी रात्री पोलिसांतर्फे बनावट ग्राहक पाठवण्यात आले होते. यावेळी त्याठिकाणी सुरू असलेला गैरप्रकार उघडकीस आला. त्यानुसार उपआयुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी. व्ही. खटावकर, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर, हवालदार ए. व्ही. सूर्यवंशी व इतर कर्मचारी यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या चार महिलांना ताब्यात घेवून त्यांची सुटका करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये लॉजच्या मॅनेजरसह कामगारांचा समावेश आहे. मिथुन पुजारी (२७), दिवाकर शेट्टी (३५) व रुसीराम शर्मा (४३) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)