पंतप्रधान मोदी नागपूर मुक्कामी
By Admin | Updated: October 10, 2014 01:02 IST2014-10-10T01:02:26+5:302014-10-10T01:02:26+5:30
भारताचे पंतप्रधान आणि भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी रात्री १०.३० वा. मुंबईहून नागपूरमध्ये आगमन झाले. त्यांचा राजभवनात मुक्काम असल्याने परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी नागपूर मुक्कामी
ब्रह्मपुरीला जाणार : सुरक्षेचा घेरा
नागपूर : भारताचे पंतप्रधान आणि भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी रात्री १०.३० वा. मुंबईहून नागपूरमध्ये आगमन झाले. त्यांचा राजभवनात मुक्काम असल्याने परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. राज्य विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. गुरुवारी रात्री ते विमानतळाहून थेट राजभवनावर गेले. सेमिनरी हिल्सच्या राजभवनावरील प्रवेशद्वारावर त्यांचा ताफा १०.४५ वाजता दाखल झाला. त्यावेळी चारही बाजूंची वाहतूक थांबवून ठेवण्यात आली. १० आॅक्टोबरला ब्रह्मपुरी येथे सकाळी १०.३० वाजता त्यांची जाहीर सभा आहे. त्यासाठी ते नागपूर येथून सकाळी ९.१० मिनिटाने रवाना होणार आहेत. त्यापूर्वी त्यांची भाजपचे स्थानिक नेते भेट घेण्याची शक्यता आहे. तीन दिवसातील मोदी यांची ही दुसरी नागपूर भेट आहे. ७ तारखेला त्यांची येथे प्रचार सभा झाली होती. यावेळी मोदींनी विश्रांतीसाठी नागपूरची निवड केली. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी नागपुरात पहिल्यांदाच मुक्कामी असल्याने त्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून शहर पोलिसांनी राजभवन आणि आजूबाजूच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त लावला आहे. सशस्त्र सुरक्षा रक्षकांसह साध्या वेशातील पोलीस मोठ्या संख्येत गेल्या २४ तासांपासून परिसरात तैनात आहेत. एसपीजी आणि एसपीयूचेही पथक राजभवनाच्या आतमध्ये बंदोबस्तावर नजर ठेवून आहेत. (प्रतिनिधी)