परवानगी नसलेल्या प्रकल्पाचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन !

By Admin | Updated: July 20, 2016 00:28 IST2016-07-20T00:28:12+5:302016-07-20T00:28:12+5:30

आंबेडकर वसाहतीचा पुनर्विकास करण्याच्या कामास झोपडपट्टी विकास प्राधिकरणाकडून मान्यताच मिळाली नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला

Prime Minister inaugurated the unauthorized project | परवानगी नसलेल्या प्रकल्पाचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन !

परवानगी नसलेल्या प्रकल्पाचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन !


पुणे : स्मार्ट सिटी योजनेला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या औंधच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचा पुनर्विकास करण्याच्या कामास झोपडपट्टी विकास प्राधिकरणाकडून मान्यताच मिळाली नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमापूर्वी प्रत्येक बाबीची कसून तपासणी केली जात असतानाही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
‘स्मार्ट सिटी’अंतर्गत एकूण १४ प्रकल्पांचे मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात अर्धवट अवस्थेत असलेल्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या पार्श्वभूमीवर यातील बाबासाहेब आंबेडकर वसाहतीच्या प्रकल्पासाठी तर मान्यताही घेतली नसल्याचा प्रकार उजेडात आला आहे. काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी त्याबाबतची कागदपत्रे उजेडात आणली आहेत.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत औंध येथील सव्वादोन एकर क्षेत्रावर असलेल्या आंबेडकर वसाहतीचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याचा प्रकल्प आयुक्तांनी मांडला होता. झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत हा विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या योजनेला मान्यता देण्यात यावी, असे पत्र स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ७ जून रोजी पाठविले होते. मात्र, आंबेडकर वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा कोणताही प्रस्ताव एसआरएकडे आला नसल्याचे पालिकेला २० जून रोजी कळविण्यात आले. तरीही पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले असल्याचे संजय बालगुडे यांनी सांगितले.
आंबेडकर वसाहतीमध्ये एसआरए प्रकल्प राबविण्याबाबत २१ जून रोजी नागरिकांची बैठक घेण्यात आली होती. मात्र ती पावसामुळे होऊ शकली नाही. त्यानंतर २३ जून रोजी आयोजित केलेली बैठकही झाली नाही. एसआरए प्रकल्प एखाद्या ठिकाणी राबविण्यासाठी तेथील नागरिकांचे संमतीपत्र आवश्यक असते. त्या संमतीपत्रासह एसआरए प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. मात्र या कोणत्याही प्रक्रिया न पार पाडता आयुक्तांनी या प्रकल्पाचा पंतप्रधानांच्या हस्ते रिमोटद्वारे बटन दाबून शुभारंभ केला आहे.
>काम काहीच नाही; पण उद्घाटनाचे मार्केटिंग
स्मार्ट सिटी योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते २५ जून रोजी उद्घाटनाचा कार्यक्रम पुण्यात घ्यायचा असल्याचे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांना केवळ ८ दिवस अगोदर कळविण्यात आले. स्मार्ट सिटी योजनेच्या कामालाही अद्याप सुरुवात झालेली नव्हती.
कोणत्याही कामाचे टेंडर काढण्यात आले नव्हते. त्यामुळे अवघ्या ८ दिवसांत उद्घाटन कोणत्या प्रकल्पांचे करायचे, असा प्रश्न आयुक्त कुणाल कुमार यांच्यासमोर पडला. त्यामुळे बहुतांश अर्धवट प्रकल्पांचेच पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेचे काम काहीच नाही; पण उद्घाटने करून त्याचे देशभर मार्केटिंग करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
>प्रकल्पांची माहिती मागविली
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलेले बहुतांश प्रकल्प अर्धवट अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाल्याने रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे गटनेते सिद्धार्थ धेंडे यांनी या सर्व प्रकल्पांच्या कागदपत्रांची माहिती मागविली आहे. या प्रकल्पांना मान्यता कधी घेतली, त्याचे टेंडर कधी काढले, काम सध्या कुठल्या टप्प्यात आहे, याची माहिती मागविली आहे.
>औंध येथील बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील एसआरए प्रोजेक्ट हा एक चांगला प्रकल्प असेल. त्याचे नोटिफिकेशन एसआरएने प्रसिध्द केले आहे. या प्रकल्पाला लवकरच मान्यता मिळेल. त्यामुळे त्याबाबत करण्यात आलेले आरोप तथ्यहीन आहेत.
- कुणाल कुमार, महापालिका आयुक्त

Web Title: Prime Minister inaugurated the unauthorized project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.