पंतप्रधान परदेशात चेकबुक घेऊन फिरतात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2015 01:42 IST2015-05-19T01:42:46+5:302015-05-19T01:42:46+5:30
अन्य राष्ट्रांचे नेते परदेशात आपल्या तंत्रज्ञानाची मार्केटिंग करत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात खरेदीचा धडाका लावला आहे.
पंतप्रधान परदेशात चेकबुक घेऊन फिरतात!
खडे बोल : पृथ्वीराज चव्हाण यांची नरेंद्र मोदींवर टीका
नाशिक : अन्य राष्ट्रांचे नेते परदेशात आपल्या तंत्रज्ञानाची मार्केटिंग करत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात खरेदीचा धडाका लावला आहे. ते परदेशात चेकबुकच खिशात घेऊन फिरत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
एका व्याख्यानासाठी नाशिकमध्ये आले असता, पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी नरेंद्र मोदींचा कारभार आशावादी वाटत नसल्याचे सांगितले. केंद्र सरकार हे एकसंघ म्हणून काम करीत नसून, सर्वत्र मोदींची एकाधिकारशाही सुरू आहे. नियोजन आयोगासारखी सरकारची ‘थिंक टँक’ असलेली संस्था मोदींनी बरखास्त केली. उद्योगांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. विज्ञान व तंत्रज्ञानातील गुंतवणूक प्रचंड वाढवणे गरजेचे असताना, मोदींना फक्त परराष्ट्र धोरणातच रस आहे. परदेशात जाताना ते खिशात चेकबुक घेऊनच फिरतात. फ्रान्सकडून केलेली राफेल विमानांची खरेदी असो की, चीनशी अब्जावधी डॉलर्सचे करार असोत, मोदी फक्त वाटायला निघाले आहेत. देशातील परकीय गुंतवणुकीतही वाढ झाली नसल्याने ‘मेक इन इंडिया’चा फुगा फुटला आहे, अशा शब्दांत त्यांनी तोफ डागली.
नरेंद्र मोदी हे अद्यापही स्वत:ला गुजरातचे मुख्यमंत्रीच समजत असून, त्यामुळे महाराष्ट्राचे उद्योग गुजरातकडे पळविले जात असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. (प्रतिनिधी)
अवैज्ञानिक पंतप्रधान : चव्हाण यांनी मोदींच्या अवैज्ञानिक दृष्टिकोनावर टीका केली. विज्ञान-तंत्रज्ञानात देश आधीच पिछाडीवर असताना, मोदींसारखा देशाचा प्रमुखच अवैज्ञानिक विधाने करीत आहे. हत्तीचे शिर माणसाला लावून गणपती तयार करणे हा प्लास्टिक सर्जरीचा प्रकार असल्याचे, भारतात पुराणकाळात विमाने तयार झाल्याचे दावे त्यांनी वैज्ञानिकांसमोर केले. हा अंधश्रद्धेचा प्रकार असून, असेच सुरू राहिले तर देश कधीच वैज्ञानिक नेतृत्व करू शकणार नाही, असेही ते म्हणाले.