पुजारी तरुण निघाला बैल चोर
By Admin | Updated: August 11, 2014 22:50 IST2014-08-11T22:50:18+5:302014-08-11T22:50:18+5:30
हनुमान मंदिराचा पुजारी तरुण बैल चोर निघाला असून त्याला पोलिसांनी बोलते करताच त्याने जलंब परिसरातील ४ ते ५ बैलजोड्या लंपास केल्याची कबुली दिली आहे.

पुजारी तरुण निघाला बैल चोर
जलंब : स्थानिक भोश्री हनुमान मंदिराचा पुजारी तरुण बैल चोर निघाला असून त्याला पोलिसांनी बोलते करताच त्याने जलंब परिसरातील ४ ते ५ बैलजोड्या लंपास केल्याची कबुली दिली आहे. कैलास अग्रवाल यांची बैलजोडी चोरुन ती विकण्याचा प्रयत्न करीत असताना तो रंगेहाथ पकडल्या गेल्यामुळे त्याचे खरे रुप १0 ऑगस्टच्या रात्री उघड झाले.
जलंब नजीकच्या भोश्री येथील हनुमान मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून मोहनलाल शर्मा हे पुजारी म्हणून आहेत. त्यांचा मुलगा धर्मेंद्र उर्फ टिक्या हा सुध्दा पुजारी म्हणून काम करतो. ८ ऑगस्टच्या रात्री कैलास ब्रिजमोहन अग्रवाल रा. खेर्डा ह.मु. खामगाव यांच्या खेर्डा शिवारातील गोठय़ातील लाल रंगाची बैलजोडी अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. सदर बैलजोडीची किंमत ७0 हजार रुपये आहे. या बैलजोडीच्या शोधासाठी अग्रवाल यांच्याकडून ठिकठिकाणचे गुरांचे बाजार पाहणे सुरु होते. १0 ऑगस्ट रोजी कळंबा कसुरा ता. बाळापूर येथील बाजारात धर्मेंद्र उर्फ टिक्या हा सदर बैलजोडी घेवून आला होता.
बैलजोडी ओळखल्यानंतर अग्रवाल यांनी जलंब पोलिसांशी संपर्क साधला व घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. माहिती मिळताच ठाणेदार माकोडे व कर्मचार्यांनी कळंबा कसुरा येथे धाव घेतली व धर्मेंद्र उर्फ टिक्याला ताब्यात घेवून त्याला पो.स्टे.ला आणले. दरम्यान या बैल चोरीप्रकरणी धर्मेंद्र उर्फ टिक्या मोहनलाल शर्मा याच्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोहेकाँ. जयपालसिंग मोरे, मिसाळ, उमेश शिरसाट, इंगळे आदी करीत आहेत.