‘मन की बात’मध्ये अकोल्यातील ‘निसर्गकट्टा’च्या कार्याचा गौरव!
By Admin | Updated: August 28, 2016 23:09 IST2016-08-28T23:09:51+5:302016-08-28T23:09:51+5:30
पंतप्रधानांनी केले निसर्गकट्टा संस्थेकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन.

‘मन की बात’मध्ये अकोल्यातील ‘निसर्गकट्टा’च्या कार्याचा गौरव!
अकोला, दि. २८ : पर्यावरणाच्या रक्षणासाठी अकोल्यातील 'निसर्गकट्टा'सारख्या सामाजिक संस्थेकडून प्रेरणा घ्यावी आणि कार्य करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात या कार्यक्रमात केली. यावेळी पंतप्रधानांनी संस्थेच्या सामाजिक कार्याबद्दल गौरवोदगारही काढले.
दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात. रविवारी पंतप्रधानांनी मन की बातमधून जनतेला आगामी गणेशोत्सव आणि दुर्गोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करीत नागरिकांनी मातीच्या मूर्तींंना महत्त्व द्यावे, असे सांगत त्यांनी विदर्भातील अकोल्यातील एक पर्यावरणस्नेही निसर्गकट्टा ही संस्था पर्यावरणाच्या रक्षणासाठी झटत आहे. गणेशोत्सवात शाडू मातीचे गणपती बनविण्यासाठी आणि नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी या संस्थेचा दरवर्षी पुढाकार असतो, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी निसर्गकट्टा संस्थेच्या कार्याचा गौरव केला आणि या संस्थेकडून प्रेरणा घेऊन पर्यावरणपूरक सण, उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांनी अकोल्यातील निसर्गकट्टा संस्थेच्या कार्याची घेतलेली दखल अकोल्यातील नागरिकांसाठी अभिमानास्पद आहे. पंतप्रधानांनी अकोल्यातील एखाद्या संस्थेच्या कार्याची दखल घेण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. अमोल सावंत, संदीप वाघाडकर यांनी २00५ मध्ये पर्यावरणसंदर्भात जनजागृती करण्यासाठी निसर्गकट्टा सुरू केला. निसर्गकट्टा ही विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांंसाठी सुरू केलेली एक चळवळ आहे. निसर्गकट्टा संस्थेशी जिल्हय़ासोबतच शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी जुळलेले आहेत. निसर्गकट्टाच्या माध्यमातून दरवर्षी पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती बनविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांंसाठी कार्यशाळा घेण्यात येतात. यासोबतच वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पक्ष्यांचे रक्षण, पक्ष्यांसाठी घरटी बनवून त्याचे वितरण करणे, प्लास्टिक निर्मूलनासाठी जनजागृती आदी उपक्रम सातत्याने निसर्गकट्टातर्फे घेण्यात येतात. निसर्गकट्टाच्या कार्यामुळे अकोलेकर नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव, दुर्गोत्सव साजरा करण्यासंदर्भात जागरूकता निर्माण झाली आहे.
पंतप्रधान कार्यालयातील सचिव निसर्गकट्टाशी परिचित
पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले डॉ. श्रीकर परदेशी हे अकोल्यात जिल्हाधिकारी होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अकोल्यात नरनाळा महोत्सव, पर्यावरणपूरक अनेक उपक्रम घेतले. निसर्गकट्टा संस्थेचे कार्य त्यांनी जवळून पाहिले. डॉ. परदेशी यांच्या माध्यमातून निसर्गकट्टाच्या कार्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंंत पोहोचली आणि चक्क पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमादरम्यान निर्सगकट्टाच्या उपक्रमांचे कौतुक केले.