मुसलमानासोबतच भारतीय असल्याचा अभिमान - ओवेसी
By Admin | Updated: February 4, 2015 18:45 IST2015-02-04T18:42:17+5:302015-02-04T18:45:41+5:30
इंग्रंजाविरोधात मुसलमानही लढले असून आमच्या देशप्रेमावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे बंद करा, मुसलमानप्रमाणेच भारतीय असल्याचाही आम्हाला अभिमान आहे असे ओवेसी यांनी म्हटले आहे.
मुसलमानासोबतच भारतीय असल्याचा अभिमान - ओवेसी
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ४ - इंग्रजांविरोधात मुसलमानही लढले असून आमच्या देशप्रेमावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे बंद करा, आम्ही मुसलमान असल्याचा जेवढा अभिमान आहे, तेवढाच अभिमान भारतीय असल्याचाही आहे असे मत एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी मांडले आहे. मुस्लीम समाज मागास असून त्यांना आरक्षण मिळायलाच हवे अशी मागणी ओवेसी यांनी पुण्यातील सभेत केली आहे.
एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांची वादाच्या भोव-यात सापडलेली पुण्यातील सभा बुधवारी कडेकोट पोलिस बंदोबस्तात पार पडली. या सभेपूर्वी पुणे पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड करत तणाव निर्माण होऊ दिला नाही. ओवेसी यांनीदेखील या सभेत प्रक्षोभक विधान करणे टाळले व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी लावून धरली. महाराष्ट्राच्या पोलिस खात्यात मुस्लीमांची संख्या किती, राज्यात उच्चपदावर एकही मुस्लीम अधिकारी नाही असा दावा त्यांनी केला. मुस्लिम हे मागास असून त्यांना आरक्षण देण्याची गरज आहे. मुस्लिमांना आरक्षण नाकारणारे हे माणूसकीच्याविरोधात आहे असे ओवेसी यांनी सांगितले. अमित शहा, पीसी पांडे यांचा सोहराबुद्दीन चकमकीतून लगेच क्लीन चीट मिळते, पण मुसलमान तरुणांच्या केसेस अनेक वर्षांपासून सुरुच आहेत असे त्यांनी सांगितले. तुरुंगात जाऊन काही लोकं ८ पॅक्स बनवून बाहेर येतात असा टोलाही त्यांनी संजय दत्तला उद्देशून लगावला.