डाळींच्या भावात घट, नवीन मूग १५ आॅगस्टनंतर बाजारात येणार !
By Admin | Updated: July 21, 2016 16:36 IST2016-07-21T16:36:14+5:302016-07-21T16:36:14+5:30
हरभरा डाळीसह सर्वच डाळींचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहक महागाईत पार होरपळून निघाला होता. मात्र, समाधानकारक पाऊस व पोषक वातावरणामुळे पिक चांगले येणार

डाळींच्या भावात घट, नवीन मूग १५ आॅगस्टनंतर बाजारात येणार !
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २१ : हरभरा डाळीसह सर्वच डाळींचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहक महागाईत पार होरपळून निघाला होता. मात्र, समाधानकारक पाऊस व पोषक वातावरणामुळे पिक चांगले येणार असे,आशादायक वातावरण तयार झाले आहे. त्यात नवीन मूग आवक १५ आॅगस्टनंतर सुरु होणार असल्याने साठेबाजांनी आपल्याकडील साठा विक्रीला आणल्याने होलसेल विक्रीत सर्व डाळींच्या भावात घट झाली आहे.
डाळींचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करीत आहे. मात्र, त्याचा फारसा परिणाम, बाजारपेठेवर दिसून येत नसल्याचे आढळून आले आहे. मुळात मोठ्या साठेबाजांवर कारवाई करण्या ऐवजी होलेसेल, किराणा विक्रेत्यांना लक्ष केले जात आहे. मागील तीन वर्षाच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झाला आहे. तसेच काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मूग,उडीद,तूरीसाठी हे वातावरण पोषक आहे. यंदा उत्पादन चांगले होणार यामुळे साठेबाजांची मनोवृत्तीत बदल झाला आहे. नवीन मूग,उडीद बाजारात येण्याआधीच जुनी विक्री करण्यासाठी साठेबाज सक्रिय झाले आहेत
परिणामी, आठवडाभरात डाळींच्या भावात क्विंटलमागे ५०० ते १००० रुपर्यांपर्यंत घट झाली आहे. कर्नाटकातील नवीन मूग १५ आॅगस्टपर्यंत बाजारात येणार आहे. त्यानंतर आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील नवीन मूग बाजारात दाखल होईल. परिणामी क्विंटलमागे १ हजार रुपयांनी भाव कमी होऊन ८००० ते ८५०० रुपये प्रतिक्विंटलने गुरुवारी मुग डाळ विक्री झाली. उन्हाळासंपला आणि आता उडीदचा उठाव कमी झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात उडीदचे भाव कमी झाले तसेच नोव्हेंबरमध्ये नवीन उडीदची आवक सुरु होईल परिणामी १ हजार रुपयांनी भाव कमी होऊन उडीदडाळ १४००० ते १५००० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीन तूर बाजारात येईल. तूरीची लागवडही मागील तीन वर्षाच्या तुलनेत दिडपट अधिक झाल्याचे कमिशन एजंट प्रकाश जैन यांनी सांगितले. तूरडाळीतही ५०० रुपये कमी झाले असून १२५०० ते १३३०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. यंदा हरभराडाळीच्या भावाने पहिल्यांदाच शंभरी ओलांडली. यामुळे महागाइचाविषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला. ५०० रुपये कमी होऊन गुरुवारी १०००० ते ११००० रुपये प्रतिक्विंटल हरभराडाळ विकल्या गेली. पुढील सणासुदीचे दिवस लक्षात घेता सर्व डाळींना चांगली मागणी राहणार आहे.