ठाण्यात ९०६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
By Admin | Updated: October 7, 2014 05:38 IST2014-10-07T05:38:40+5:302014-10-07T05:38:40+5:30
निवडणूक काळात समाजकंटकांकडून कोणत्याही कारवाया होऊ नये म्हणून पोलीस काळजी घेत आहेत.

ठाण्यात ९०६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
पंकज रोडेकर, ठाणे
निवडणूक काळात समाजकंटकांकडून कोणत्याही कारवाया होऊ नये म्हणून पोलीस काळजी घेत आहेत. त्या दृष्टीने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तसेच विविध आंदोलनांमध्ये भाग घेणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. जिल्ह्यातील ठाणे शहर, ग्रामीण आणि नवी मुंबई या भागांत पोलिसांनी ९०६ जणांवर प्रतिबंधात्मक करवाई केली आहे.
लोकसभा निवडणूक जिल्ह्यात पूर्णपणे शांततेमध्ये पार पडली होती. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नव्हता. विधानसभा निवडणूकही शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील पोलिसांनी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडीत बिघाडी झाल्याने ते-ते पक्ष निवडणूक आखाड्यात आमने-सामने उतरले आहेत. तसेच इच्छुकांना उधाण आल्याने जिल्ह्यात २३८ उमेदवार रिंगणात आहेत. साधारणत: प्रत्येक मतदारसंघात १० उमेदवार आहेत.
सर्वाधिक २२ उमेदवार उल्हासनगर मतदारसंघात आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे पोलिसांचीही कसोटी लागणार आहे. यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील ठाणे शहर, ग्रामीण पोलीस आणि नवी मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक १ हजार ४०९ प्रकरणांपैकी ९०६ जणांवर कारवाई केली आहे. यात ठाणे पोलिसांनी ३५४, नवी मुंबई पोलिसांनी १२१ तर ठाणे ग्रामीण पोलिसांनी ४३१ जणांवर कारवाईचा बडगा उगारल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)