मसापच्या कारभारावर बरसले अध्यक्षच!

By Admin | Updated: October 2, 2015 03:47 IST2015-10-02T03:47:47+5:302015-10-02T03:47:47+5:30

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व अध्यक्ष प्र. चिं.

The president of the masap! | मसापच्या कारभारावर बरसले अध्यक्षच!

मसापच्या कारभारावर बरसले अध्यक्षच!

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व अध्यक्ष प्र. चिं. शेजवलकर यांनी चार वर्षांच्या नाराजीला वाट करून देत कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांच्या कारभाराची चिरफाड केली. अध्यक्ष म्हणजे अडगळ असे कार्याध्यक्षांना वाटत असावे, म्हणूनच त्यांनी गेली चार वर्षे मला खड्यासारखे बाजूला ठेवले, असा थेट आरोप शेजवलकर यांनी केला.
सर्वसाधारण सभेत परिषद पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर सदस्यांनी तर आरोप केलेच; पण शेजवलकर यांनीही कार्याध्यक्षांच्या कामकाजावर बोट ठेवले. परिषदेच्या कारभाराचा उबग आल्यामुळेच एक वर्षात राजीनामा दिल्याचे प्रा. द. मा. मिरासदार यांनी आपल्याला सांगितले होते, असा गौप्यस्फोट करीत शेजवलकर म्हणाले, की मला अध्यक्षपदाचा लोभ नाही. माझ्याही मनात राजीनामा देण्याचा विचार आला होता. परिषदेने साडेचार वर्षात साहित्यविषयक उपक्रम राबविले नाहीत. साताऱ्याचे रवींद्र बेडकीहाळ आणि चाळीसगावचे प्राचार्य तानसेन जगताप यांनी समस्यांना वाचा फोडली. त्यावर चर्चा सुरू असतानाच शेजवलकर यांनीही मनातील खदखद व्यक्त केली. त्यांनी परिषदेच्या अंतर्गत कारभाराबाबत समाधानी नसल्याचे सांगितले. परिषदेच्या कारभाराविषयी अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तसेच पत्ररुपाने नाराजी कळविल्याचे सांगितले. सभेला डॉ. माधवी वैद्य यांची उपस्थिती आवश्यक होती. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पुढे ढकलता आली असती. त्या उपस्थित
असत्या तर त्यांना सदस्यांच्या भावना कळाल्या असत्या, असेही त्यांनी नमूद केले.
साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद मिळायला हवे होते; पण मिळाले नाही. त्या विषयी तक्रार नाही. महामंडळाचे अध्यक्षपद मिळविण्याचा तुमचा अधिकार नाही, तुमचा काही संबंध नाही, असे सुनाविण्यात आले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. परिषदेकडे महामंडळ असताना साहित्यसंमेलन भरविण्यापलिकडे काय केले असा प्रश्न उपस्थित करून मराठी शाळांच्या दुरवस्थेबाबत, शिक्षकांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवायला हवा होता. साहित्याकडेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे साहित्यिकही परिषदेत येत नाहीत. ज्येष्ठांना बोलवा, त्यांचा सल्ला घ्या, अशी सूचनाही शेवटी शेजवलकर यांनी केली. शेजवलकर यांनी केलेल्या वक्तव्यांचे काही जणांनी समर्थन केले तर योगेश सोमण यांच्यासह काहींनी निषेध केला. काही सदस्यांमध्ये हमरीतुमरी झाली.

Web Title: The president of the masap!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.