दुष्काळामुळे अध्यक्षपदास महानोर यांचा नकार
By Admin | Updated: June 7, 2015 02:17 IST2015-06-07T02:17:58+5:302015-06-07T02:17:58+5:30
राज्यात विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळी परिस्थित्ी असल्याने विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास

दुष्काळामुळे अध्यक्षपदास महानोर यांचा नकार
पुणे : राज्यात विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळी परिस्थित्ी असल्याने विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास कवी ना़धों़ महानोर यांनी असमर्थता दर्शविली आहे़ यासंदर्भातील पत्र गतवर्षी डिसेंबरमध्येच साहित्य महामंडळाला दिल्याचे महानोर यांनी सांगितले़ मात्र, त्या पत्राला उत्तर देण्याचे सौजन्यही अद्याप महामंडळाने न दाखविल्याने महानोरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षी टोरँंटो (कॅनडा) येथील मराठी मंडळाच्या निमंत्रणामुळे विश्व साहित्य संमेलनाचा मुहूर्त जुळून आला. त्याचवेळी अध्यक्षपदी महानोर यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु आयोजकांनी खर्च करण्यास नकार दिल्याने हे संमेलनच रद्द करावे लागले. त्यामुळे शासनाकडून मिळालेले २५ लाख रूपये परत करण्याची नामुष्की महामंडळावर ओढवली. ते संमेलनच न झाल्यामुळे महानोरांना अध्यक्षपदाची संधीच मिळू शकली नाही. त्यानंतर एका वर्षाच्या विलंबाने दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग शहरातील मराठी मंडळाकडून आयोजनाचा प्रस्ताव आल्याने महामंडळाच्या आशा पल्लवित झाल्या.
नऊ महिन्यांपूर्वी महामंडळाने जोहान्सबर्गचे अध्यक्षपद स्वीकारावे असे पत्र महानोरांना पाठविले. विश्व संमेलन अंदमानला घेण्यासाठी इच्छुक असलेल्या शिवसंघ विकास मंचाचा प्रस्ताव ४ वर्षांपासून साहित्य महामंडळाकडे पडून आहे. त्या प्रस्तावाला दरवर्षी बगल देत विदेशातच संमेलनाची पताका फडकविण्यात महामंडळाने धन्यता मानली. आता कुणीच वाली न राहिल्यामुळे महामंडळाकडूनच संमेलनासंबंधी विचारणा झाल्याने आयोजकांनी, पदाधिकाऱ्यांबरोबर रसिकांचा देखील २ दिवसाचा खर्च करावा लागेल, अशी अट ठेवून महामंडळालाच पेचात टाकले आहे.