राष्ट्रपती राजवट की काळजीवाहू सरकार?
By Admin | Updated: September 27, 2014 05:51 IST2014-09-27T05:51:00+5:302014-09-27T05:51:00+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठवून दिला

राष्ट्रपती राजवट की काळजीवाहू सरकार?
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठवून दिला. विधानसभा निवडणुकीला उणेपुरे २० दिवस बाकी असताना आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची की, काळजीवाहू सरकारला काम पाहू द्यायचे, यावर राज्यपालांनी विधी व न्याय विभागाचे मत मागविले आहे.
राष्ट्रवादीने काँग्रेसशी असलेली आघाडी तोडून स्वबळावर
विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय गुरुवारी रात्री जाहीर केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार रात्रीच राजभवनावर जाऊन राज्यपालांना भेटले आणि त्यांनी राष्ट्रवादी सरकारमधून बाहेर पडत असल्याचे पत्र दिले.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी आज सकाळी ८.३०ला राजभवनावर राज्यपालांची भेट घेऊन उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. सरकार अल्पमतात आले असल्याने आपण राजीनामा देऊ इच्छितो, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी त्या वेळीच व्यक्त केली, असे सूत्रांनी सांगितले. तर राज्य सरकार अल्पमतात
आले असल्याने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विधानसभेचे
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी राज्यपालांकडे केली.
या घटनाक्रमानंतर राज्यपालांनी विधी व न्याय विभागाचे मत मागविले. तसेच दुपारी ३च्या सुमारास महाधिवक्ता दरियास खंबाटा यांना राजभवनावर पाचारण केले. उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा, याबाबत त्यांनी कायदेशीर बाजू तपासून पाहिल्या.
नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारला करायची की, सध्याच्या सरकारला काळजीवाहू म्हणून काम करण्यास सांगायचे, याबाबतचा निर्णय राज्यपाल उद्यापर्यंत घेतील. (विशेष प्रतिनिधी)