बीडमध्ये यंदाचे बारावे विद्रोही साहित्य संमेलन
By Admin | Updated: November 3, 2014 23:26 IST2014-11-03T22:17:01+5:302014-11-03T23:26:15+5:30
भरगच्च कार्यक्रम : दोन दिवसीय सोहळ्यात परिसंवाद, चर्चासत्रे

बीडमध्ये यंदाचे बारावे विद्रोही साहित्य संमेलन
सातारा : यंदाचे बारावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन बीड येथे शनिवार, दि. १३ व रविवार, दि. १४ डिसेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत आयोजित केल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष कॉ. धनाजी गुरव व स्वागताध्यक्ष अॅड. हनुमंत उपरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बीड येथे होणाऱ्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सत्यशोधक ओबीसी संघटनेच अध्यक्ष अॅड. हनुमंत उपरे तसेच संयोजन समितीच्या अध्यक्षपदी कॉ. नामदेव चव्हाण यांची निवड झाल्याची माहिती कॉ. धनाजी गुरव यांनी दिली.
गुरव म्हणाले, ‘महात्मा फुले यांनी ग्रंथकार सभेस जे पत्र दिले त्या पत्राच्या मजकुरास अनुसरूनच आम्ही विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करत आहोत. तथाकथित साहित्य चळवळीला पर्याय देण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
बीड येथे विद्रोही साहित्य संमेलन घेण्यामागे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन करणे, हा हेतू आहे. बीड येथून क्रांतिसिंह नाना पाटील यांना लोकसभेवर जनतेने निवडून पाठविले होते. हा ऋणानुबंध कायम राहावा व क्रांतिसिंहांचे विषमतेवर आधारित समाजव्यवस्था बदलण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम विद्रोहीच्या वतीने केले जाते. ते पुढे नेण्यासाठी बीडमध्ये संमेलन आयोजित केल्याचे स्वागताध्यक्ष अॅड. हनुमंत उपरे यांनी सांगितले. बीड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या नगरीत संमेलन होणार आहे. यावेळी विद्रोहीचे राहुल गंगावणे, पूजा दळे, सागर अडागळे, अश्विन दळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
असे होणार कार्यक्रम
साहित्य संमेलनात परिसंवाद, चर्चासत्रे, कविसंमेलन, शाहिरी व आदिवासी लोककलांचा उत्सव होणार आहे.सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत मैलाचा दगड ठरणार असल्याचे उपाध्यक्ष विजय मांडके यांनी सांगितले.