वन्यप्राण्यांसाठी पाणीसाठे तयार करा
By Admin | Updated: March 6, 2017 01:29 IST2017-03-06T01:29:15+5:302017-03-06T01:29:15+5:30
उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे

वन्यप्राण्यांसाठी पाणीसाठे तयार करा
अकोले : सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. त्यामुळे अकोले वनक्षेत्रात असणाऱ्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी पाणीसाठे तयार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अकोले परिसरात लागूनच भादलवाडी, पोंधवडी या गावांमध्ये वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रात ९०.६७ हेक्टर इतके क्षेत्र आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांची संख्या आहे. अनेक प्रकारचे प्राणी, हरीण, कोल्हे, लांडगे, ससे, मुंगूस, खोकड इत्यादी वास्तव्यास आहेत. हे प्राणी उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात भटकत असतात.
सध्या अकोले परिसरातील पाण्याचे साठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे प्राणी पाण्याच्या शोधात भटकत असताना वाहनांना धडकून अपघात होऊन मृत्युमुखी पडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे वेळीच पाण्याची व्यवस्था केल्यावर प्राण्यांना मोकळ्या जागी भटकण्याची गरज पडणार नाही. (वार्ताहर)
सध्या वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची ठिकाणे कोरडी पडली आहेत. या वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय वनखात्याने करणे गरजेचे आहे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य शामराव पाटील यांनी वनविभागाकडे केली आहे. गेल्या वर्षी भिगवण येथील रोटरी क्लब या सामाजिक संस्थेने वन्यप्राण्यांना पाणी देण्यासाठी पाण्याच्या साठवणुकीची व्यवस्था चांगल्याप्रकारे केली होती. त्यामुळे गेल्या उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्याची सोय उत्तमप्रकारे झाली होती. मात्र, या वर्षी उन्हाळा सुरू होण्याची चाहूल लागल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी इतरत्र भटकत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी सगळ्या स्तरातून होत आहे.याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी सांगितले, की वन्यप्राण्यांना पाणी देण्यासाठी भिगवण येथे कार्यरत असणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येईल, तसा अहवाल मागवून कार्यवाही करण्यात येईल.अकोले
परिसरातील वनक्षेत्रात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने प्राण्यांची तहान भागवण्यासाठी पाणीसाठे तयार करण्याची मागणी होत आहे.