आयुक्तालयासाठी महापालिका तयार
By Admin | Updated: July 4, 2016 01:56 IST2016-07-04T01:56:33+5:302016-07-04T01:56:33+5:30
पिंपरी-चिंचवड शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करावे, यासाठी शासनस्तरावर सर्वेक्षण झाले असून, त्यासाठी महापालिकेने जागा द्यावी

आयुक्तालयासाठी महापालिका तयार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करावे, यासाठी शासनस्तरावर सर्वेक्षण झाले असून, त्यासाठी महापालिकेने जागा द्यावी, तसेच यासाठी
येणाऱ्या खर्चाचा काही भाग उचलावा, अशी मागणी शहरातील लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय नेत्यांकडून होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी जोर धरू लागली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कालखंडात तत्कालीन आमदार विलास लांडे, आमदार लक्ष्मण जगताप यांनी याबाबत जोरदार मागणी केली होती. मात्र, त्यासाठी आवश्यक असणारा खर्च अधिक असल्याने ही मागणी मागे पडली होती. मात्र, भोसरी एमआयडीसी, वाकड पोलीस ठाण्यास मंजुरी मिळाली होती. तसेच विश्रांतवाडीस असणारा भाग एकत्रित करून दिघी आणि देहूरोडचा भाग एकत्रित करून चिखली पोलीस चौकी सुरू केली होती.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी आणि पोलीस यंत्रणेवर येणारा ताण कमी करण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. राज्यात सत्तांतर झाल्याने भाजपा-सेना युतीच्या कालखंडात स्वतंत्र आयुक्तालयाच्या मागणीने जोर धरला आहे. आमदार जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
पोलीस आयुक्तालयासाठी लोकप्रतिनिधी सरसावले असून, यासाठी शासनाने अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणीही केली आहे. तसेच काही आमदारांनी येत्या पावसाळी अधिवेशनात याबाबत लक्षवेधीही लावली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसे, आरपीआय अशा विविध पक्षांच्या नेत्यांनीही मागणी केली आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय असावे अशी अपेक्षा नागरिकांमधून होत आहे. ही मागणी पूर्ण होईल अशी त्यांची अपेक्षा आहे.(प्रतिनिधी)
>लोकसंख्या वाढीमुळे गुन्हेगारीचेही प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस बळ कमी आहे. या शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय असावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच प्राधिकरणाकडे जागा उपलब्ध आहे. तिथे पोलीस आयुक्तालय सुरू करता येऊ शकते. तसेच यासाठी सरकारकडून मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. - लक्ष्मण जगताप, आमदार
>पिंपरी-चिंचवड शहर वाढते आहे. लोकसंख्या वाढते आहे, गुन्हेगारीसुद्धा वाढत आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय ही काळाची गरज आहे. शहराची कायदा, सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने स्वतंत्र पोलीस आयुक्त महत्त्वाचे असून, आवश्यक ते सहकार्य करण्याची महापालिकेची तयारी आहे. काही अंशी खर्चाचा भार पेलण्याची तयारीसुद्धा महापालिकेची तयारी आहे. - शकुंतला धराडे, महापौर