पर्यटकांच्या माहितीसाठी ‘किआॅस्क’ मशिन तयार
By Admin | Updated: November 16, 2014 23:55 IST2014-11-16T21:34:57+5:302014-11-16T23:55:50+5:30
एमटीडीसीच्यावतीने पर्यटकांना माहिती देण्यासाठी किआॅस्क मशिन तयार

पर्यटकांच्या माहितीसाठी ‘किआॅस्क’ मशिन तयार
कणकवली : पर्यटनाला चालना देण्याबरोबरच पर्यटकांना महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांबरोबरच स्थानिक लोककला तसेच सण, उत्सवांची माहिती तत्काळ मिळावी, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)च्यावतीने ‘किआॅस्क’ ही टचस्क्रीन मशिन तयार करण्यात आली आहे. येथील तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीत लवकरच ही मशिन बसविण्यात येणार आहे.
राज्यातील निसर्गसंपन्न अशा विविध भूप्रदेशाची माहिती पर्यटकांना मिळावी, तसेच त्यांना अशा ठिकाणांना भेट देता यावी, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने अद्ययावत माहिती पर्यटकांना देण्यासाठी पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून एटीएम मशिनसारखी किआॅस्क मशिन तयार करण्यात आली आहे.व्हिडीओ चित्रणाद्वारे पर्यटकांना या मशिनच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे. इंटरनेटद्वारे ही मशिन कार्यान्वित झाल्यानंतर अवघ्या एका ‘टच’वर पर्यटकांना माहिती मिळू शकणार आहे.मराठी व इंग्रजी भाषेतून एमटीडीसीचे संकेतस्थळ त्यावर उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे राज्यातील पर्यटनस्थळे, तेथे जाण्याचा मार्ग, एमटीडीसीचे रिसॉर्ट, तेथील आरक्षणासह विविध माहिती पर्यटकांना मिळणार आहे. यामध्ये समुद्रकिनारे, किल्ले, लेणी, सण, उत्सव, लोककला अशा विविधांगी माहितीचा समावेश असणार आहे. या माहितीच्या आधारे पर्यटनासाठी स्थळ निश्चित करणे पर्यटकांसाठी सोयीचे होणार आहे.दरम्यान, कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या नूतन इमारतीत प्रवेशद्वाराजवळ ही मशिन बसविण्यात येणार असल्याची माहिती येथील महसूल विभागाच्या सूत्रांनीदिली. (वार्ताहर)
एमटीडीसीच्यावतीने पर्यटकांना माहिती देण्यासाठी किआॅस्क मशिन तयार करण्यात आली आहे.