‘संकटाला तोंड देण्याची तयारी ठेवा’
By Admin | Updated: December 26, 2014 02:08 IST2014-12-26T02:08:56+5:302014-12-26T02:08:56+5:30
आत्महत्येने कुठलेही प्रश्न सुटत नसतात, ही बाब कायम ध्यानात ठेवून येणाऱ्या कुठल्याही संकटांना न जुमानता त्याचा धैर्याने सामना करण्याची

‘संकटाला तोंड देण्याची तयारी ठेवा’
उमरगा (जि.उस्मानाबाद) : आत्महत्येने कुठलेही प्रश्न सुटत नसतात, ही बाब कायम ध्यानात ठेवून येणाऱ्या कुठल्याही संकटांना न जुमानता त्याचा धैर्याने सामना करण्याची ताकद स्वत:मध्ये निर्माण करा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी येथे केले.
कवठा सेवाग्राम येथे भारत विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या पुढाकारातून सुरू केलेल्या चारा छावणीचा शुभारंभ अण्णांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
गावचा सर्वांगिण विकास करण्याची जबाबदारी आता प्रत्येक ग्रामस्थाने स्वीकारण्याची गरज निर्माण झाल्याचे सांगून हजारे म्हणाले, बाह्ण आनंदापेक्षा अंत:करणातील आनंद सर्वश्रेष्ठ असतो. त्यामुळे प्रत्येकाशी माणुसकीच्या नात्याने वागून प्रत्येकाला जगण्याचा आनंद देत रहा. नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी पाणी संवर्धन हा महत्त्वपूर्ण पर्याय आहे. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत साठवून त्याचे संवर्धन करा. माती आणि पाणी वाहून जाऊ देऊ नका. शास्त्रशुध्द पध्दतीने पाणलोट क्षेत्र विकासाची कामे हाती घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.
दहा एकरांवर उभारलेल्या छावणीत गाय, म्हैस, बैल, वासरे, दुभती जनावरे अशा वेगवेगळ्या स्वतंत्र छावण्या उभारण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)