हिवाळी सुटीत रेल्वेची ‘प्रीमियम’ लूट
By Admin | Updated: December 25, 2014 02:22 IST2014-12-25T02:22:00+5:302014-12-25T02:22:00+5:30
हिवाळी सुटीत मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या पाहता त्याचा फायदा घेत पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून

हिवाळी सुटीत रेल्वेची ‘प्रीमियम’ लूट
मुंबई : हिवाळी सुटीत मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या पाहता त्याचा फायदा घेत पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून ‘प्रीमियम’ लूट करण्यात आली आहे. मागणीनुसार या गाड्यांच्या तिकिटांची किंमत भरमसाट वाढत असल्याने यातून रेल्वेला चांगलेच उत्पन्न मिळते. मात्र प्रवाशांच्या खिशाला कात्री लागते. महत्त्वाची बाब म्हणजे काही ट्रेन प्रीमियम म्हणून सोडताना मध्य रेल्वेने तर एकेरी प्रवासासाठीच प्रीमियम ट्रेन म्हणून चालवण्याचा प्रयोग केल्याचे समोर आले आहे. यातून प्रवाशांचा कुठलाही विचार न करता रेल्वे फक्त उत्पन्नाचाच विचार करत असल्याचे दिसते.
स्पेशल ट्रेनलाही गर्दीच्या काळात मिळणारा फायदा पाहता रेल्वेने हिवाळी सुटीत बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रीमियम सेवाही देण्याचा निर्णय घेतला या प्रीमियम ट्रेन सोडतानाही काही ट्रेन एकेरी प्रवासासाठीच प्रीमियम म्हणून चालवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. मध्य रेल्वेकडून ट्रेन नंबर 0२0६५ अशी एलटीटी ते एर्नाकुलम प्रीमियम ट्रेन चालवतानाच 0२0६६ नॉन प्रीमियम ट्रेन चालवण्यात येत आहे. तसेच ट्रेन नंबर 0२0५७ आणि 0२0५८ एलटीटी ते तिरुनेलवेल्ली ट्रेन आणि ट्रेन क्रमांक 0२0५९ आणि 0२0६0 पुणे ते एर्नाकुलमही तशाच प्रकारे चालवण्यात येत असल्याचे रेल्वेतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अशा प्रकारे हा पहिलाच प्रयोग रेल्वेकडून केला जात असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, संपूर्ण प्रीमियम सेवांमध्ये मुंबई ते करमाळी २२ फेऱ्या आणि मुंबई ते नागपूर आठ फेऱ्या, सीएसटी ते करमाळी शताब्दीच्या १२ फेऱ्या आणि मुंबई ते चेन्नई, पुणे ते मडगाव, वांद्रे टर्मिनस ते मडगाव, मुंबई ते सिकंदराबाद या ट्रेनचा समावेश आहे. (प्रतिनिधी)