चाकरमान्यांची ‘प्रीमियम’ लूट
By Admin | Updated: August 26, 2014 04:16 IST2014-08-26T04:16:59+5:302014-08-26T04:16:59+5:30
गणेशोत्सवासाठी कोकणात लाखोंच्या संख्येने जाणाऱ्या सर्वसामान्य चाकरमान्यांना एसटी आणि खाजगी वाहतूक सेवांपेक्षा स्वस्त आणि जलद सेवा असलेल्या रेल्वेचा खूप मोठा आधार वाटतो

चाकरमान्यांची ‘प्रीमियम’ लूट
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात लाखोंच्या संख्येने जाणाऱ्या सर्वसामान्य चाकरमान्यांना एसटी आणि खाजगी वाहतूक सेवांपेक्षा स्वस्त आणि जलद सेवा असलेल्या रेल्वेचा खूप मोठा आधार वाटतो. म्हणूनच विशेष ट्रेनची संख्या गणेशोत्सवकाळात वाढवण्यात यावी, अशी मागणी वारंवार केली जाते आणि त्याप्रमाणे मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून सोयही करण्यात येते. मात्र यंदा जादा आणि विशेष ट्रेनच्या नावाखाली रेल्वेकडून ४६ ‘प्रिमियम’ (अधिमूल्य, चढाभाव) ट्रेनही चालवण्यात आल्या असून या ट्रेनच्या तिकिट सेवेतून मोठी लूट चालवण्यात येत आहे. या प्रिमियम ट्रेनचे अवाढव्य वाढत जाणाऱ्या भाड्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे.
गणेशोत्सवकाळात रेल्वेचे तिकिट मिळवताना बरीच मारामार करावी लागत असल्याने अनेक जण एसटीचा पर्याय निवडतात आणि त्यामुळे या काळात एसटी हाऊसफुल्ल होऊन जातात. तरीही काहीजण रेल्वेला गर्दी असतानाही तिकिटांच्या किंमतीकडे पाहून उभ्यानेही प्रवास करणे पसंत करतात. एकूणच प्रत्येक वर्षी वाढत जाणारी गर्दी पाहता रेल्वेकडून यंदा जादा आणि विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी साधारण १२0 विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यंदा १९८ विशेष ट्रेन सोडण्यात आल्या असून यात ४६ ट्रेन एसी प्रिमियम ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. मात्र प्रिमियम ट्रेनचे तिकिट वाढत्या मागणीनुसार वाढत जात असल्याने एका तिकिटांची किंमत ही एक हजार रुपयांपासून ते चार हजार रुपये आणि त्याही पुढे जात आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना हे तिकिट परवडणारे नसल्याने अनेक जणांनी या ट्रेनकडे पाठ फिरवली आहे.
मुळात या काळात प्रवाशांची गर्दी आटोक्यात राहावी आणि त्यांचा प्रवास सुकर व्हावा यानिमित्ताने जादा आणि विशेष गाड्या सोडण्याऐवजी अशा न परवडणाऱ्या ४६ प्रिमियम ट्रेन सोडून रेल्वेने नेमके काय साध्य केले असा प्रश्न चाकरमान्यांना सतावू लागला आहे. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून मात्र कुठलेही ठोस असे उत्तरही देण्यात येत नसल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)