आगारांचा होणार कायापालट
By Admin | Updated: February 14, 2015 04:15 IST2015-02-14T04:15:53+5:302015-02-14T04:15:53+5:30
बकालपणा आलेल्या एसटी आगारांचा कायापालट करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. यासाठी १६ फेब्रुवारीपासून १५ दिवस

आगारांचा होणार कायापालट
मुंबई : बकालपणा आलेल्या एसटी आगारांचा कायापालट करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. यासाठी १६ फेब्रुवारीपासून १५ दिवस राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबविले जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्वच्छता अभियानात एसटी कर्मचाऱ्यांचा सहभाग निश्चित असून, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
राज्यात एसटीचे २५0 आगार आहेत. या आगारात मात्र प्रवाशांना अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. ठिकठिकाणी असलेला कचरा, पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय, कँटीनमध्ये खाद्यपदार्थांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे प्रवाशांना एसटीचा प्रवास आणि त्यांच्या सुविधा नकोशा होतात. त्याचप्रमाणे एसटीला नवीन आगारांची संकल्पना राबविणे सध्या तरी शक्य नाही. या सर्व कारणांमुळे एसटी आगारांमध्ये १६ फेब्रुवारीपासून १५ दिवस स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. या अभियानातंर्गत आगार आणि बसस्थानकांत सफाई, प्रसाधनगृहांची स्वच्छता, कचराकुंड्या बसविणे, झाडे लावणे इत्यादी उपक्रम राबविले जातील. ही योजना कायमस्वरूपी ठेवण्याचा प्रयत्न असेल, असे रावते म्हणाले. या कामासाठी मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांकडून मदत केली जाणार आहे. तसेच शिवसेनेतर्फे सर्व जिल्हाप्रमुखानांही या अभियानात सहभागी होण्याच्या सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)