प्रीती झिंटाची नेस वाडियाविरुद्ध विनयभंगाची तक्रार
By Admin | Updated: June 14, 2014 04:27 IST2014-06-14T04:27:40+5:302014-06-14T04:27:40+5:30
प्रसिद्ध अभिनेत्री व किंग्ज इलेव्हन पंजाबची सहमालकीण प्रीती झिंटा हिने तिचा माजी प्रियकर प्रसिद्ध उद्योगपती नेस वाडिया याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली

प्रीती झिंटाची नेस वाडियाविरुद्ध विनयभंगाची तक्रार
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री व किंग्ज इलेव्हन पंजाबची सहमालकीण प्रीती झिंटा हिने तिचा माजी प्रियकर प्रसिद्ध उद्योगपती नेस वाडिया याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. कलम ३५४ अंतर्गत मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे.
सूत्रांनी सांगितले की, नेस वाडिया व प्रीतीचे गेली पाच वर्षे प्रेमसंबंध होते. या काळात नेसने तिला दादर येथे घरही दिले आहे. त्यांचे प्रेमप्रकरण संपुष्टात आल्याची चर्चा असली तरी कुरबुरी सुरुच होत्या. तरीही तो तिच्याशी सलगी साधण्याचा प्रयत्न करत होता, मात्र लष्करी शिस्तीतील प्रीती खेळाच्या मैदानावरही प्रेमातील हा खिलाडूपणा स्वीकारायला तयार नव्हती.
३० मे रोजी वानखेडे स्टेडियमवर पंजाब आणि चेन्नईविरुद्ध सामना दरम्यान गरवारे पॅव्हेलियनमध्ये नेस तिच्याशी उद्धटपणे बोलला, शिवीगाळ करून झटापट केली. घटनेनंतर १३ दिवसांनी स्वत: प्रीतीने पोलिस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली, अशी माहिती पोलिसांनी दिली. ज्यांनी ही घटना पाहिली त्या सर्वांची चौकशी करून तसेच वाडिया यांचीही चौकशी करु, असेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, नेस वाडियांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे ऐकून मला धक्का बसला. हे आरोप पूर्णपणे खोटे व बिनबुडाचे आहेत.