प्रेयसीला दोनदा गर्भपाताला भाग पाडणा-या प्रियकराला अटक
By Admin | Updated: February 20, 2017 16:31 IST2017-02-20T16:31:30+5:302017-02-20T16:31:30+5:30
लग्नाचे स्वप्न दाखवून तरुणीशी शरीरसंबंध ठेवून नंतर तिची फसवणूक करणा-या 28 वर्षीय युवकाला पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे.

प्रेयसीला दोनदा गर्भपाताला भाग पाडणा-या प्रियकराला अटक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - लग्नाचे स्वप्न दाखवून तरुणीशी शरीरसंबंध ठेवून नंतर तिची फसवणूक करणा-या 28 वर्षीय युवकाला पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. पीडित तरुणी या युवकापासून दोनवेळा गर्भवती राहिली. त्याने तिला गर्भपात करण्यासही भाग पाडले. व्हॅलेंटाईन्स डे च्या दिवशी जेव्हा तरुणीने फिनाईल पिऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि तरुणी 2013 मध्ये भेटले. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. दोघांमधील प्रेमाची जवळीक शरीरसंबंधांमध्ये बदलली. आरोपीने लग्नाचे स्वप्न दाखवून तरुणीबरोबर अनेकवेळा शरीरसंबंध ठेवले. 2016 मध्ये ही युवती तरुणापासून गर्भवती राहिल्यानंतर त्याने गर्भपात केंद्रामध्ये नेऊन तिला गर्भपात करायला भाग पाडले.
त्यानंतर त्याने तिच्या आई-वडिलांची भेट घेतली. ती सुद्धा त्याच्या आई-वडिलांना जाऊन भेटली. पण दोघांच्याही कुटुंबियांना त्यांच्यामध्ये शरीरसंबंधांवरुन काय घडले आहे याची कल्पना नव्हती. त्यानंतर तरुणीला युवकाचे आणखी एका महिलेबरोबर प्रेमसंबंध असल्याचे समजले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला.
पण युवकाने लग्नाचे आश्वासन दिल्याने वाद मिटला. 2017 मध्ये पीडित तरुणी पुन्हा गर्भवती राहिली. त्यावेळी प्रियकराचा फोन तपासताना त्याचे आणखी एका ठिकाणी प्रेमसंबंध असल्याचे तिला समजले. त्यावरुन दोघांमध्ये जोरदार वाद झाला. तिने लग्नाचा विषय काढला तेव्हा त्याने साफ नकार दिला.
व्हॅलेंटाईन्स डे च्या दिवशी तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा ती गर्भवती असल्याचे समजले आणि हा सारा प्रकार उजेडात आला. या घटनेची पोलिस तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.