जामखेडमध्ये पूर्ववैमनस्यातून खून
By Admin | Updated: November 18, 2014 02:08 IST2014-11-18T02:08:20+5:302014-11-18T02:08:20+5:30
येथील आरोळे वस्तीवर पूर्ववैमनस्यातून सोमवारी सकाळी आठच्या सुमारास एका युवकाचा तलवारीने वार करून खून करण्यात आला़ पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला

जामखेडमध्ये पूर्ववैमनस्यातून खून
जामखेड (अहमदनगर) : येथील आरोळे वस्तीवर पूर्ववैमनस्यातून सोमवारी सकाळी आठच्या सुमारास एका युवकाचा तलवारीने वार करून खून करण्यात आला़ पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे.
बाळू जिजाबा माने असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जामखेडमधील करमाळा रस्त्याजवळच्या आरोळेवस्ती येथे सरकार व समता असे तरुणांचे दोन गट आहेत. या दोन्ही गटांमध्ये सातत्याने भांडणे होतात.दोन महिन्यांपूर्वी या दोन गटात वाद झाला होता. समता ग्रुपमधील सोनू वाघमारे व इतर पाच जणांविरोधात फिर्याद दाखल झाली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास समता ग्रुपमधील निखिल घायतडक, दत्ता शिंदे, बाळू जिजाबा माने व संजय महादेव विटकर व्यायामशाळेत व्यायामासाठी गेले होते. त्यानंतर आठच्या सुमारास सरकार ग्रुपमधील सोनू बबन वाघमारे, विक्रम भगवान डाडर, प्रमोद बबन गव्हाळे, युवा राजू डाडर, सुनील राजू डाडर हे तलवार, गज, काठ्या तर सागर सुभाष गवासणे हे रिव्हॉल्वर घेऊन आले़ त्यांनी बाळू माने याच्या छातीवर व गळ्यावर कोयता व तलवारीने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बाळूचा जागीच मृत्यू झाला. तर सागर गवासणे याने बाळूसोबत असलेल्या निखिल घायतडक, दत्ता शिंदे व संजय विटकर यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली. संजय विटकर यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनास पाठविला. घटनेच्या निषेधार्थ विविध संघटना व ग्रामस्थांतर्फे मंगळवारी जामखेड बंदचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)