प्रवीण दरेकर उद्धव ठाकरेंच्या भेटीला
By Admin | Updated: December 27, 2014 17:41 IST2014-12-27T17:18:40+5:302014-12-27T17:41:10+5:30
मनसेला सोडचिठ्ठी देणारे माजी आमदार प्रवीण दरेकर यांनी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा उधाण आले आहे.
प्रवीण दरेकर उद्धव ठाकरेंच्या भेटीला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन मनसेला सोडचिठ्ठी देणारे माजी आमदार प्रवीण दरेकर यांनी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा उधाण आले आहे. मात्र ही सदीच्छा भेट असल्याचे सांगत दरेकर यांनी या भेटीविषयी अधिक भाष्य करण्यास नकार दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत मनसेच्या निराशाजनक कामगिरीनंतर माजी आमदार प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत मनसेला सोडचिठ्ठी दिली होती. राज ठाकरे आपल्या जुन्या सहका-याची समजूत काढून त्यांना पुन्हा सोबत आणतील अशी आशा होती. मात्र राज ठाकरेंनी दरेकर यांचा राजीनामा स्वीकारत सर्वांनाच धक्का दिला होता. ऐवढेच नव्हे तर दरेकर यांनी राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी दिलेली गाडीही राज ठाकरेंनी परत दरेकरांकडे पाठवून दिली होती.
यापार्श्वभूमीवर दरेकर यांनी शनिवारी उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दरेकर यांनी यापूर्वी भाजपा नेत्यांचीही भेट घेतली होती. मात्र त्यावेळीदेखील दरेकर भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. आता दरेकर मातोश्रीवर पोहोचल्याने चर्चेला उधाण आले आहे.