प्रवीण दरेकर आणि वसंत गीते भाजपामध्ये
By Admin | Updated: January 12, 2015 15:23 IST2015-01-12T15:23:25+5:302015-01-12T15:23:25+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करणारे माजी आमदार प्रवीण दरेकर आणि वसंत गीते हे दोघे भाजपामध्ये प्रवेश करणार आहे.

प्रवीण दरेकर आणि वसंत गीते भाजपामध्ये
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करणारे माजी आमदार प्रवीण दरेकर आणि वसंत गीते हे दोघे भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. मंगळवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
विधानसभा निवडणुकीत मनसेच्या निराशाजनक कामगिरीनंतर प्रवीण दरेकर आणि वसंत गीते या दोघांनीही मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता. दरेकर आणि गीते हे दोघेही पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा होती.मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी या दोघांचाही राजीनामा स्वीकारत सर्वांनाच धक्का दिला होता. हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. अखेरीस सोमवारी प्रवीण दरेकर आणि वसंत गीते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले.
प्रवीण दरेकर आणि वसंत गीते यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्याने मनसेसाठी हा मोठा हादरा समजला जात आहे. हे दोघेही मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंसोबत होते. पण विधानसभा निवडणुकीतील पराभवाने राज ठाकरेंचे निकटवर्तीयही त्यांच्यापासून दुरावल्याचे दिसते.