प्रणयचे मारेकरी १२ तासांत जेरबंद
By Admin | Updated: January 26, 2017 05:31 IST2017-01-26T05:31:03+5:302017-01-26T05:31:03+5:30
प्रेम प्रकरणाच्या संशयातून महाविद्यालयीन विद्यार्थी प्रणय सुरेश मोरे (२०) याच्या निर्घृण हत्येप्रकरणी मानपाडा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत दोघा मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

प्रणयचे मारेकरी १२ तासांत जेरबंद
डोंबिवली : प्रेम प्रकरणाच्या संशयातून महाविद्यालयीन विद्यार्थी प्रणय सुरेश मोरे (२०) याच्या निर्घृण हत्येप्रकरणी मानपाडा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत दोघा मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
विघ्नेश सरकटे (२१, रा. आजदेगाव) आणि योगेश जैस्वाल (१९, रा. सागर्ली) अशी अटक केलेल्या मारेकऱ्यांची नावे आहेत. सागर्ली गावातील साउथ इंडियन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रणयची मंगळवारी दुपारी १२.३०च्या सुमारास हत्या झाली होती. प्रणय कॉलेज सुटल्यानंतर आपल्या मित्रांसह कॉलेजच्या इमारतीजवळ बोलत उभा होता. त्या वेळी विघ्नेश आणि योगेश हे दोघे तेथे आले. बोलण्याचा बहाणा करून ते प्रणयला बाजूला घेऊन गेले. त्यानंतर, त्याच्यावर सुरा आणि चॉपरने ८ ते ९ वार केले. त्यानंतर, ते तेथून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या प्रणयचा खासगी रु ग्णालयात उपचारादरम्यान काही वेळातच मृत्यू झाला.
या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करू न कसोशीने शोध घेऊन विघ्नेश आणि योगेश यांना रात्री उशिरा सागर्ली गावातून अटक केली. दरम्यान, ही हत्या विघ्नेशची प्रेयसी आणि प्रणय यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींना कल्याण न्यायालयाने ३१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे अजूनही सापडलेली नाहीत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)