प्रणवच्या के.सी.गांधी शाळेचा १४१३ धावांनी विजय
By Admin | Updated: January 5, 2016 15:39 IST2016-01-05T15:28:02+5:302016-01-05T15:39:56+5:30
के.सी.गांधी शाळेने प्रतिस्पर्धी आर्य गुरुकूल शाळेचा तब्बल १४१३ धावांनी पराभव केला.

प्रणवच्या के.सी.गांधी शाळेचा १४१३ धावांनी विजय
ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. ५ - प्रणव धनावडेच्या तडाखेबंद १००९ धावांच्या खेळींच्या जोरावर १४६५ धावांचा डोंगर उभारणा-या के.सी.गांधी शाळेने प्रतिस्पर्धी आर्य गुरुकूल शाळेचा तब्बल १४१३ धावांनी पराभव केला.
गांधी शाळेच्या भेदक गोलंदाजीसमोर आर्य गुरुकूलचा अवघ्या ५२ धावात खुर्दा उडाला. एच.टी.भंडारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत के.सी.गांधीने मोठया विजयाची नोंद केली. शालेय क्रिकेटच्या इतिहासात इतक्या मोठया फरकाने मिळालेला हा पहिलाच विजय असेल.
या संपूर्ण सामन्यात स्टार ठरला तो कल्याणचा प्रणव, त्याने अभूतपूर्व असा फलंदाजीचा नजराणा पेश करत फक्त ३२३ चेंडूत नाबाद १००९ धावा फटकावल्या. या खेळीत प्रणवने १२४ चौकार आणि ५९ षटकार लगावले.
प्रणवच्या या मास्टर खेळीबद्दल खुद्द मास्टर-बलास्टर सचिन तेंडुलकरने त्याचे टि्वटरवरुन अभिनंदन केले. शाब्बास प्रणव, एका डावात एक हजार धावा करणारा तू पहिला फलंदाज आहेस, अजून मेहनत कर, भविष्यात तुला अजून नवी शिखर गाठायची आहेत.
Congrats #PranavDhanawade on being the first ever to score 1000 runs in an innings. Well done and work hard. You need to scale new peaks!
— sachin tendulkar (@sachin_rt) January 5, 2016