Prakash Ambedkar News: विरोधकांना लकवा मारला आहे. त्यामुळे भारताला घेरण्याच्या भूमिकेत जग असताना, व्यक्ती की देश हा प्रश्न उपस्थित होणार आहे. हे केवळ एकट्या नरेंद्र मोदी यांच्यामुळे झालेले आहे. देशाला घेरण्यापासून वाचवायचे असेल, तर नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला सत्तेवर येऊ देता कामा नये. त्यांना बळी पडलात, तर देशाला बळी कराल, हे लक्षात घ्या. देशातील मतदार शहाणपणाने वागणार का, हे त्यांनीच ठरवायचे आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशाला पर्याय कोण असेल, यावर विचार करू नका. तुम्हाला नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षापासून देशाला वाचवायचे आहे. १४० कोटींमधून कुणीतरी पुढे येऊन देशाला चालवू शकतो, ही ताकद आणि हिंमत आहे, यावर विश्वास ठेवा. नरेंद्र मोदी निवृत्त झाले तर चांगले आहे, यामुळे देशाला घेरले जात आहे, ते थांबेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
दिल्लीत जरी इंडिया आघाडी, महाविकास आघाडीची बैठक झाली असली, तरी शरद पवार हे भाजपाचे हस्तक आहेत. शरद पवार भाजपाचे हस्तक आहेत. ते त्यातून कधीही बाहेर पडू शकत नाहीत. देश पातळीवर घडामोडी करणारी माणसे वेगळी आहेत. तुमच्यासमोर असणारी माणसे वेगळी आहेत. राहुल गांधी, अखिलेश यादव, शरद पवार यांच्यात मोदींना आव्हान देण्याची हिंमत आहे का? विरोधकांना लकवा मारल्याने पंतप्रधान मोदी यांना विरोध करू शकत नाहीत. १५ दिवस थांबा, देशाच्या राजकारणातील एक नवीन बातमी समजेल, असा मोठा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
दरम्यान, आमच्याशिवाय त्यांच्या विरोधात कुणी लढणार नाही. व्हीव्हीपॅट नसेल, तर आम्ही निवडणुकीत भाग घेणार नाही, असे सांगावे. व्हीव्हीपॅट असेल, तरच निवडणुकीत सामील व्हा. व्हीव्हीपॅट नसेल, तर बॅलेट पेपरवर या. या घडामोडीत विरोधक कुठेही चित्रात नाहीत आणि त्यांना कोणी विचारतही नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.