राम का गुणगान करिए...

By Admin | Updated: November 26, 2014 01:07 IST2014-11-26T01:07:49+5:302014-11-26T01:07:49+5:30

लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवारी भावपूर्ण स्वरसुमनांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Praise Rama ... | राम का गुणगान करिए...

राम का गुणगान करिए...

श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांना भावपूर्ण स्वरसुमनांजली
नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवारी भावपूर्ण स्वरसुमनांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सकाळची पावित्र्याने भरलेली वेळ आणि बाबूजींच्या आठवणींचा गहिवर असणाऱ्या या कार्यक्रमात भजन, अभंगांचे सुरेल सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने यावेळी उपस्थित ईश्वराच्या संकीर्तनात रमले.
लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा कलाविथिकेत या स्वरसुमनांजलीचे आयोजन करण्यात आले. पल्लवी कुंभारे यांनी सुरेल तान छेडून ‘गगन सदन तेजोमय...’ या प्रार्थनागीताने कार्यक्रमाला प्रारंभ केला. बाबूजींच्या प्रसन्न मुद्रेतल्या छायाचित्राला पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ माजी आमदार यादवराव देवगडे यांच्या हस्ते करण्यात आला. गायिका पल्लवी यांनी पहिल्याच गीताने बाबूजींच्या स्मृतिनिमित्त आयोजित कार्यक्रमाची वातावरणनिर्मिती साधली. याप्रसंगी त्यांनी ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी..., अरे राम भजो अरे राम भजो..., राम का गुणगान करीए...’ आदी भक्तीगीते सादर करून कार्यक्रमाची उंची वाढविली. यानंतर पल्लवी कुंभारे यांना सहगायक म्हणून संवादिनीवर साथ देणाऱ्या प्रशांत भिंगारे यांनी ‘आया हूं दरबार तुम्हारे...’ हे भजन सादर केले. या सुरेल कार्यक्रमाचा समारोप पल्लवी कुंभारे यांनी महात्मा गांधी यांचे आवडते भजन ‘वैष्णव जन तो तेणे कहिए...’ या भक्तीगीताने केला. याप्रसंगी लोकमत परिवारातील सदस्य विजय नगरकर यांनी ‘अनंता तुला कोण पाहू शके...’ हा अभंग सादर करून उपस्थितांना तल्लीन केले. गायकांना तबल्यावर अनुप तायडे, मायनरवर महेश काळे यांनी साथसंगत केली. ध्वनिव्यवस्था अशोक दुरुगकर यांची होती. या कार्यक्रमाचे नेटके संयत निवेदन सुनील कोंगे यांनी केले.
या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. श्रद्धेय बाबूजींच्या प्रतिमेला भावपूर्णतेने पुष्पांजली अर्पण करून याप्रसंगी उपस्थित श्रोते बाबूजींचे स्मरण करीत होते. कार्यक्रमाला लोकमत परिवारातील ज्येष्ठ सदस्य विंग कमांडर रमेश बोरा, युनिट हेड नीलेश सिंग, हेमंतराव गावंडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Praise Rama ...