....पुढील स्टेशन प्रभादेवी ! एलफिन्स्टन आणि सीएसटी स्टेशनचं नामकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 22:15 IST2017-05-06T21:11:26+5:302017-05-06T22:15:45+5:30

एलफिन्स्टन रोडऐवजी ‘प्रभादेवी’ तर छत्रपती शिवाजी टर्मिनसऐवजी ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असं नामकरण होणार आहे.

Prabhadevi next station! Named Alfinston and CST stations | ....पुढील स्टेशन प्रभादेवी ! एलफिन्स्टन आणि सीएसटी स्टेशनचं नामकरण

....पुढील स्टेशन प्रभादेवी ! एलफिन्स्टन आणि सीएसटी स्टेशनचं नामकरण

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - गेल्या कित्येक वर्षांपासून सीएसटी आणि प्रभादेवी रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्यात यावं अशी मागणी होत होती. अखेर केंद्र सरकारने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे सीएसटी म्हणजेच छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि एलफिन्स्टन रोड या रेल्वे स्टेशनचं नाव लवकरच बदलणार आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर याची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे.
 
एलफिन्स्टन रोडऐवजी ‘प्रभादेवी’ तर छत्रपती शिवाजी टर्मिनसऐवजी ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असं नामकरण होणार आहे. या दोन्ही रेल्वे स्थानकांचं नाव बदलण्यात यावं यासाठी अनेक आंदोलनंही झाली. 1991 साली दिवाकर रावते महापौर असताना मुंबई महापालिका सभागृहात पहिल्यांदा हा नामांतराचा ठराव मांडण्यात आला होता. 
 
शहरातील ऐतिहासिक वास्तूच्या नावात सीएसटी अर्थात छत्रपती शिवाजी टर्मिनसऐवजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा बदल करावा यासाठी केंद्र सरकारने अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेत एल्फिन्स्टन रोडऐवजी प्रभादेवी या नामकरणाचाही समावेश करण्यात आला आहे.
 
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी विमानतळ या दोन्ही नावांमध्ये बदल करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. या दोन्ही नावांमध्ये शिवरायांसाठी आदरार्थी समजला जाणारा ‘महाराज’ या शब्दाचा उल्लेख नव्हता. यामुळे दोन्ही नावांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये नामकरणाला मंजुरी मिळवली. दरम्यान, राज्याच्या मंजुरीनंतर या विषयाचा चेंडू केंद्राकडे टोलावण्यात आला होता. त्यानुसार केंद्र सरकारने सीएसटीऐवजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा उल्लेख करावा, अशी अधिसूचना जाहीर केली. या अधिसूचनेत पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन रोडच्या नावात बदल करून ‘प्रभादेवी’ करण्याच्या सूचनेचाही समावेश करण्यात आला आहे.
 

Web Title: Prabhadevi next station! Named Alfinston and CST stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.