‘त्यांच्या’ जगण्यामागे सौरऊर्जेचे बळ !

By Admin | Updated: January 25, 2015 00:55 IST2015-01-25T00:55:33+5:302015-01-25T00:55:33+5:30

रात्रीचा किर्रर्र अंधार, मात्र दूर शेतात लख्ख प्रकाशाने दहा बाय दहाची झोपडी लखलखत होती़़़ झोपडीतील टेपरेकॉर्डरचा आवाज दूरपर्यंत ऐकावयास येत होता,

The power of solar energy behind their 'living'! | ‘त्यांच्या’ जगण्यामागे सौरऊर्जेचे बळ !

‘त्यांच्या’ जगण्यामागे सौरऊर्जेचे बळ !

सतीश डोंगरे - नाशिक
रात्रीचा किर्रर्र अंधार, मात्र दूर शेतात लख्ख प्रकाशाने दहा बाय दहाची झोपडी लखलखत होती़़़ झोपडीतील टेपरेकॉर्डरचा आवाज दूरपर्यंत ऐकावयास येत होता, टीव्हीही सुरू होता... ही संपूर्ण किमया होती सौरऊर्जेची. पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव फिरणाऱ्या एका गुजराती कुटुंबाने चक्क सोलर पॅनलचा वापर करीत आपली झोपडी प्रकाशमय केली होती.
औषधे, जडीबुटी विकणारे १० ते १२ कुटुंबांची बिऱ्हाडं आडगाव परिसरात वसलेली आहेत. जागा दिसेल तिथे तांडा टाकायचा अन् कोणी हुसकावून लावलं की दुसऱ्या जागेचा शोध घ्यायचा. अशात वीज कोण देणार, असा यक्षप्रश्न पडलेल्या या कुटुंबांनी चक्क सोलर पॅनलचा आधार घेत झोपड्यांमध्ये लखलखाट केला. त्यामुळे त्यांच्या पालावर वीज नसली, तरी सीएफएल दिव्यांचा प्रकाश हमखास असतो. त्यांची लहान मुलंही टीव्हीवर सिनेमा पाहण्यात दंग असतात. त्यांचं बिऱ्हाड वाहणाऱ्या गाड्यांच्या बॅटऱ्याही सौरऊर्जेवरच चार्ज केल्या जातात. शिक्षण आणि आधुनिकतेपासून कोसो दूर असलेल्या या तांड्याने ‘गरज ही शोधाची जननी असते,’ या म्हणीचा अर्थ खरा ठरविला.
या तांड्यातील शांतीबाई चोरडिया यांनी सांगितले की, औषधे, जडीबुटी विकणारी माणसं आम्ही. दोन वेळचं खायला मिळतं, हेच नशीब म्हणायचं. आता जगायला फक्त अन्नच लागत नाही, तर पालात दिवे, टीव्ही, प्रवासाला गाडी, मोबाइल या जगण्याचा भाग झाल्या आहेत. पण वीज नसेल तर यातलं काहीच मिळणार नाही.
बंगळुरूला असताना आमच्या ओळखीच्या तांड्याने सोलर पॅनल घेतले होते. सूर्याच्या प्रकाशातून वीज मिळते, हे प्रत्यक्ष बघितल्यानंतर आम्ही २० हजार रुपये खर्च करून सोलर पॅनल खरेदी केले. यामुळे आमच्या झोपडीत प्रकाश आला. बिऱ्हाडं जरी हलवायची ठरविली तरी ऊर्जेची चिंता मिटल्याचे त्या सांगतात.

विंचवाच्या पाठीवरचं बिऱ्हाड आमचं. पोट भरतंय तोपर्यंत जिथं जागा मिळंल तिथं तांडा टाकायचा अन् कुणी हुसकावलं की तिथून निघायचं. मग कोण आम्हाला वीज देणार? आमच्याकडं ना कागद, ना ओळख. हा सूर्यच आमचा देव! तो देतो प्रकाश म्हणून आमच्या पालावर रात्रीही राहतो उजेड! त्यातच सध्या व्यवसाय करताना मोबाइल, वाहन अत्यावश्यक बनल्याने ते चालविण्यासाठी ऊर्जेची गरज आहेच. त्यातूनच आम्ही सोलर पॅनेलचा वापर करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला हे कसं सुरूकरायचा हे जमत नव्हतं, मात्र सरावाने ते शिकून घेतलं, असेही या तांड्यावरील ज्येष्ठ महिला शांतीबाई चोरडिया यांनी सांगितले.

Web Title: The power of solar energy behind their 'living'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.