अखेरच्या दिवशी शक्तिप्रदर्शनाचा शो!
By Admin | Updated: September 27, 2014 05:35 IST2014-09-27T05:35:52+5:302014-09-27T05:35:52+5:30
उमेदवारी अर्ज भरण्यास शनिवारचा अखेरचा दिवस शिल्लक असल्याने आज प्रत्येक निवडणूक कार्यालयात गोंधळाचे वातावरण असेल

अखेरच्या दिवशी शक्तिप्रदर्शनाचा शो!
मुुंबई : उमेदवारी अर्ज भरण्यास शनिवारचा अखेरचा दिवस शिल्लक असल्याने आज प्रत्येक निवडणूक कार्यालयात गोंधळाचे वातावरण असेल. महायुती आणि आघाडीच्या घटस्फोटानंतर प्रतिस्पर्धी पक्षाचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते समोरासमोर ठाकल्यास राडे होण्याची शक्यता आहे.
फाटाफूट झाल्याने आपल्या पक्षातून कोणाला उमेदवारी द्यायची हा अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या चारही पक्षांना रात्री उशिरापर्यंत सोडविता आलेला नाही. त्यामुळे आजपर्यंत या प्रमुख पक्षांपैकी थोडेथोडकेच उमेदवार अर्ज भरून मोकळे झालेत. रात्री उशीरा प्रमुख पक्षांनी याद्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच अर्ज भरण्यास उमेदवारांची निवडणूक कार्यालयांमध्ये गर्दी होऊ शकेल.
फाटाफूट झाल्याने शत्रुत्वाच्या भावनेतून कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, मारामारी होण्याची शक्यता अधिक आहे. फाटाफुटीनंतरच्या नव्या समीकरणांमुळे पूर्व उपनगरात भांडुप, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व हे तीन मतदारसंघ राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनले आहेत. घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून भाजपाचे संभाव्य उमेदवार राम कदम उद्या अर्ज भरतील. त्यासोबत शिवसेनेचा संभाव्य उमेदवारही अर्ज दाखल करेल. मनसेतून भाजपामध्ये आलेल्या कदम यांना शिवसेनेचा प्रखर विरोध आहे. या दोघांचे कार्यकर्ते समोरासमोर ठाकल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल. त्याचप्रमाणे घाटकोपर पूर्वेकडील निवडणूक कार्यालयात भाजपाचे प्रकाश मेहता, काँग्रेसचे प्रवीण छेडा, शिवसेना व राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांसह येतील. यापैकी छेडा, मेहता यांच्यातील स्पर्धा, राजकीय तणाव सर्वश्रुत आहे. भांडुपमध्ये मनसेच्या शिशिर शिंदेंव्यतिरिक्त प्रमुख पक्षांपैकी कोणीच अर्ज भरलेला नाही. त्यामुळे उद्या चारही पक्षांचे उमेदवार निवडणूक कार्यालयाजवळ शक्तिप्रदर्शन करतील. अशीच परिस्थिती शहरातील अन्य निवडणूक कार्यालयांमध्येही असेल. (प्रतिनिधी)