नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याकडे शासन, सिडको व महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. आता सरकारला आपली ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. निर्णायक लढ्यासाठी तयार व्हा असे आवाहन प्रकल्पग्रस्त तरूणांनी नेरूळमधील सभेत केले आहे. गरजेपोटी बांधलेली घरे, साडेबारा टक्के भुखंडांचे वितरण करण्यात यावे. सामाजीक सुविधेसाठी कपात केलेल्या पावणेचार टक्के योजनेचे भुखंड प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांना द्यावे. गावांमधील घरांवर सुरू केलेली कारवाई थांबविण्यात यावी व इतर मागण्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आंदोलन करण्याचा इशारा आगरी कोळी युथ फाऊंडेशनने दिला आहे. यासाठी प्रत्येक गावामध्ये बैठकांचे आयोजन करण्यास सुरवात झाली आहे. नेरूळमध्ये आयोजीत केलेल्या बैठकीला दोन हजार पेक्षा जास्त ग्रामस्थ उपस्थित होते. यामुळे बैठकीला सभेचे स्वरूप प्राप्त झाले होते. आगरी कोळी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी निर्णायक लढ्यासाठी सर्वांनी संघटीत होण्याचे आवाहन केले. यावेळी कोमल ठाकूर यांनी शासनदरबारी प्रलंबीत असलेल्या प्रश्नांविषयी माहिती दिली. यावेळी नगरसेवक नामदेव भगत, गिरीश म्हात्रे, युवा नेते वैभव नाईक, निशांत भगत यांनीही मार्गदर्शन करून आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. नेरूळमधील सभेमध्ये आगरी कोळी युथ फाऊंडेशनच्या महिला पदाधिकारी रेशमाताई पाटील, रोशना पाटील, निकिता भोपी, प्रेरणा ठाकूर, कल्पेश घरत. जुलकेशा कडू, यांनीही मनोगत व्यक्त केले. जो पर्यंत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत तो पर्यंत माघार घ्यायची नाही असा इशारा यावेळी सर्वांनी दिला. (प्रतिनिधी)
भूमिपुत्रांची ताकद सरकारला दाखवू
By admin | Updated: March 2, 2017 02:14 IST