पॉवर सेंटर नागपूर

By Admin | Updated: October 30, 2014 00:52 IST2014-10-30T00:52:01+5:302014-10-30T00:52:01+5:30

मुख्यमंत्र्यांचे सचिवालय असलेले हैदराबाद हाऊस आजवर फक्त हिवाळी अधिवेशन काळातच प्रशासकीय कामासाठी उपयोगात येत असल्याचे पहायला मिळायचे. या काळातच येथे अधिकाऱ्यांची वर्दळ असायची.

Power Center Nagpur | पॉवर सेंटर नागपूर

पॉवर सेंटर नागपूर

नागपूर : मुख्यमंत्र्यांचे सचिवालय असलेले हैदराबाद हाऊस आजवर फक्त हिवाळी अधिवेशन काळातच प्रशासकीय कामासाठी उपयोगात येत असल्याचे पहायला मिळायचे. या काळातच येथे अधिकाऱ्यांची वर्दळ असायची. आता मात्र, नागपूरचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे हैदराबाद हाऊस राज्य कारभाराचा मुख्य केंद्रबिंदू राहील. रामगिरीवरही महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय घेतले जातील. या दृष्टीने या दोन्ही ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा सज्ज राहणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस हे साधारणत: शनिवार आणि रविवारी नागपूरला मुक्काम असतील. मात्र, या काळातही ते राज्यकाराभावर लक्ष ठेवून असतील. यासाठी या दोन्ही ठिकाणी ‘२४ बाय ७’ विशेष व्यवस्था केली जाणार आहे. तशी तयारी आतापासून सुरू झाली आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या काही दिवसांपूर्वी सचिवालय नागपुरातील हैदराबाद हाऊसमध्ये दाखल होते. प्रशासकीय फाईल्स येथे आणल्या जातात. रामगिरीवरही मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सुरू होते. प्रशासकीय बैठका, मंत्रिमंडळाची बैठक, शिष्टमंडळांच्या भेटीगाठी आदी सर्व बाबी येथे पार पाडल्या जातात. अधिवेशन संपले की रामगिरी अन् हैदराबाद हाऊस या दोन्ही ठिकाणी प्रशासकीय वर्दळ संपते. मात्र, आता या दोन्ही ठिकाणी पुढील पाच वर्षे नियमितपणे मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सरू राहील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहतील, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांना द्यावयाची निवेदने हैदराबाद हाऊसमध्ये किंवा रामगिरीवरील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात स्वीकारली जातात. अधिवेशनानंतर ही सोय नसते. आता या दोन्ही ठिकाणी कायमस्वरुपी कार्यालय राहणार असल्यामुळे नागरिकांना आपले प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सोय होणार आहे.
देवेंद्र फडणवीस शुक्रवारी मुख्यमंत्री म्हणून राज्यकारभार स्वीकारतील. कितीही यश मिळाले तरी जमीन सोडायची नाही, मातीतल्या लोकांना विसरायचे नाही, असा फडणवीस यांचा स्वभाव आहे. त्यामुळे स्थानिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी फडणवीस नागपूरलाही अधिक वेळ देतील, यात शंका नाही. येत्या काळात नागपूर हे खऱ्या अर्थाने ‘पॉवर सेंटर’ होणार आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचे त्रिकोणीपार्क येथील घर, शासकीय निवासस्थान ‘रामगिरी’ यासह सचिवालय ‘हैदराबाद हाऊस’ येथील वर्दळ वाढणार असून या तिन्ही सत्ताकेंद्रांना विशेष महत्त्व येणार आहे.
२७६, त्रिकोणी पार्क
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महालातील वाडा व संघ मुख्यालय या नंतर आता नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरातील निवासस्थान असलेले ‘२७६, त्रिकोणी पार्क’ हे एक नवे ‘पॉवर सेंटर’ उदयास येणार आहे. फडणवीस यांचे हे घर यापूर्वीही राजकीय हालचालीचे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांच्या काळात प्रमोद महाजनसारख्या दिग्गज नेत्यांसह संघ परिवारातील दिग्गजांनी येथे हजेरी लावली आहे. या घराच्या भिंतींनी राजकीय वर्दळ अनुभवलेली आहे. आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या घराला वेगळेच महत्त्व येणार आहे. फडणवीस नागपूर मुक्कामी असताना त्यांच्या या घरी महत्त्वाच्या बैठका होतील, दिग्गज नेते येथे भेटी देतील. या नव्या ‘पॉवर सेंटर’ची सर्वत्र चर्चा असेल यात शंका नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Power Center Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.