विदेशातून येणार बटाटे !

By Admin | Updated: October 27, 2014 00:34 IST2014-10-27T00:34:18+5:302014-10-27T00:34:18+5:30

सर्वत्र दिवाळी साजरी केली जात असताना वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. किरकोळ बाजारात १०० रुपये किलो सांभार आणि ६० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या हिरव्या मिरचीने

Potatoes coming from abroad! | विदेशातून येणार बटाटे !

विदेशातून येणार बटाटे !

नागपूर : सर्वत्र दिवाळी साजरी केली जात असताना वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. किरकोळ बाजारात १०० रुपये किलो सांभार आणि ६० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या हिरव्या मिरचीने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. ठोक बाजारात भाज्या आटोक्यात असल्या तरीही किरकोळमध्ये महागच आहेत. ही परिस्थिती केव्हा सुधारणार, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. कळमना येथील कांदे-बटाटे असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी सांगितले की, वाढत्या किमतीवर नियंत्रण आणि घरगुती उपलब्धता वाढविण्यासाठी सरकारने पहिल्यांदा बटाटे आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी उत्पादनाचा अंदाज वर्तविल्याने गेल्या १५ दिवसांपासून किमतीत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात दर्जानुसार किंमत प्रति किलो ३५ ते ४० रुपयांवर पोहोचली आहे. सध्या बाजारात जुना स्टॉक विक्रीसाठी येत आहेत. कानपूर आणि आग्रा येथे मालाचा शॉर्टेज आहे. या ठिकाणातून नवीन मालाची आवक येण्यास पुन्हा दोन ते अडीच महिने लागतील. कर्नाटकमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्केच उत्पादन आहे. त्याचा परिणाम भाववाढीवर झाला. स्टोरेजमधील माल संपत आहे. बाजारात उपलब्धता वाढविण्यासाठी आयात हाच एकमेव मार्ग असल्याचे सरकारचे मत आहे. नोव्हेंबरमध्ये पहिली खेप येईल. बटाट्याची आयात युरोप आणि पाकिस्तानातून केली जाईल. जानेवारीपर्यंत पर्याप्त साठा करण्यासाठी आयातीचा निर्णय आहे.
बटाट्यावर अवलंबून असलेल्या उद्योजकांनाही आयात करण्यास सांगितले आहे. घरगुती उपलब्धता वाढविणे आणि किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने जूनमध्ये निर्यातीवर ४५० डॉलर प्रति टन किमान निर्यात मूल्य (एमईपी) लागू केले आहे. सध्या बटाट्यावर ३० टक्के आयात शुल्क आहे. कळमना बाजारात दररोज १८ ते २० ट्रक बटाटे येत आहेत. या बाजारपेठेतून संपूर्ण विदर्भात माल विक्रीस जातो. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भाव वाढल्याचे वसानी यांनी सांगितले.
किरकोळमध्ये कांदे २५ रुपये
यंदाच्या दिवाळीत किरकोळमध्ये चांगल्या दर्जाचे कांदे २५ रुपयांवर पोहोचले आहे. कळमना बाजारात आंध्र प्रदेश, कनार्टक आणि धुळे (महाराष्ट्र) येथून कांद्याची आवक आहे. या भागात चांगला पाऊस झाल्याने उत्पादन वाढले आहे.
ठोकमध्ये चांगला कांदा २० रुपये तर हलका कांदा १५ ते १७ रुपये किलो आहे. नाशिक परिसरातून नोव्हेंबर अखेरीस कांदा येईल, शिवाय आकोट, परतवाडा येथील पांढरा कांदा आणि मलकापूर, नांदुरा, शेगाव येथील लाल कांदा मार्चमध्ये येईल. कळमना बाजारात आवक कमी असून लाल कांदे १२ ते १५ ट्रक आणि पांढरे कांदे ४ ते ५ ट्रक येत आहेत.

Web Title: Potatoes coming from abroad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.