पोस्टमास्तरचे नातेवाईकच चालवताहेत पोस्ट कार्यालय
By Admin | Updated: February 13, 2015 00:57 IST2015-02-12T23:34:50+5:302015-02-13T00:57:10+5:30
आर. के. नगर कार्यालयात पोरखेळ : कामाचा निपटारा वेळेवर नसल्याने नागरिक हवालदिल

पोस्टमास्तरचे नातेवाईकच चालवताहेत पोस्ट कार्यालय
घन:शाम कुंभार - यड्राव -टपाल कार्यालयाचा दैनंदिन कारभार मुलगी, पुतण्या व इतर नातेवाइकांच्या आधारे बेकायदेशीरपणे सांभाळला जात आहे. आर. के. नगर - यड्राव टपाल कार्यालयाचे पोस्टमास्तर बी. एस. बत्ते यांनी केंद्र शासनाची नोकरी पोरखेळ बनविली आहे. यामुळे कार्यालयातून होणारे टपालासह इतर कार्यक्रम विस्कळीत झाले आहेत. याचा तोटा व नाहक त्रास सहन करण्याची वेळ ग्राहक व एजंटांवर आली आहे. याची दखल वरिष्ठांकडून कशी घेतली जाते, यावरच येथील टपाल कार्यालयाचे नियोजन अवलंबून आहे.
इचलकरंजी टपाल कार्यालयाकडून आर. के. नगर टपाल कार्यालयास शहापूर, तारदाळ, शिरढोण, टाकवडे, आर. के. नगर व जांभळी या गावांचे बटवड्याचे टपाल येतात. आर. के. नगर टपाल कार्यालयातून टपाल व त्या संबंधीच्या कामाची विभागणी येथे होते. टपाल कार्यालयात वीज बिल, फोन बिल, आर.डी. भरून घेण्याची सोय आहे. याकरिता तारदाळ व आर. के. नगरमधून काही महिला एजंट म्हणून कार्यरत आहेत. आर. के. नगर कार्यालयातून पोस्टमास्तरांच्या मनमानीमुळे सर्वच गावांचा बटवडा विस्कळीत झाला आहे. आर.डी. भरण्यासाठी लाईट बिल व फोन बिल यासाठी पैसे द्या, नंतर बिल पासबुक घेऊन जा, अशी कामाची पद्धत सुरू झाल्याने एजंट व ग्राहक त्रस्त आहेत.
पोस्टातून येणारी पत्रे वेळेवर संबंधितांना पोहोचत नसल्याने त्यांना आर्थिक, मानसिक त्रास होत आहे. कारण शासकीय, नोकरीचे अनुदान व महत्त्वाचे टपाल पोस्टाद्वारे येतात. ती वेळेवर न मिळाल्यास ग्राहकांचे सर्वांगीण नुकसान होत आहे. काही ग्राहकांचे खाती बंद करण्याचे अर्ज चार महिन्यांपासून तसेच पडून आहेत. यड्राव परिसरात वाहनांची विक्री करणारी दोन-तीन केंदे्र आहेत. त्यांच्याकडून येणारी कागदपत्रे तशीच धूळ खात पडली आहेत. या सर्व प्रकाराने नागरिक हवालदिल झाले आहेत.
पोस्टमास्तर बत्ते हे पोस्ट कार्यालयाचा संगणकाद्वारे व्यवहार करण्यासाठी मुलगी, पुतण्या व इतर नातेवाइकांना बेकायदेशीरपणे वापरास देत आहेत. कोणीही अर्ज घेऊन आले की, साहेब येऊ देत. नंतर या, असे उत्तर त्यांच्याकडून मिळत आहे. केंद्र शासनाचे अत्यंत महत्त्वाचे व जबाबदारीचे पोस्टमास्तर पद असून, बेकायदेशीर वापर करून पोस्टमास्तर पोरखेळ करीत आहेत. या मुलांकडून एखादी चूक झाल्यास, अजाणतेपणी महत्त्वाची टपाल गहाळ झाल्यास ग्राहकांचे मोठे नुकसान होऊ शकते. इतकी बेफिकिरी केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांकडून होत आहे. याकडे वरिष्ठांकडून कशी दखल घेतली जाते, यावर येथील टपाल कार्यालयाचे नियोजन अवलंबून आहे. तसेच पोरखेळ थांबवावा, ग्राहकांना सुलभ सेवा मिळावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
दोषी आढळल्यास कारवाई
पोस्ट कार्यालयामध्ये विभागाच्या कर्मचाऱ्याव्यतिरिक्त कोणासही काम करता येत नाही. तसा कोणी प्रकार सुरू केला असेल, तर तो बेकायदेशीर आहे. त्याची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे कोल्हापूर विभागाचे सीनिअर सुपरिटेंडेंट पोस्ट आॅफिसर रमेश पाटील यांनी सांगितले.