घरपोच सेवेने पोस्टाची वर्षभरात २८ कोटींची कमाई
By Admin | Updated: June 30, 2016 04:40 IST2016-06-30T04:40:10+5:302016-06-30T04:40:10+5:30
आरटी्ओत फेऱ्या माराव्या लागत असल्याने परिवहन विभागाकडून चालक परवाना पोस्टाने घरपोच देण्याची सुविधा काही वर्षांपूर्वी सुरु केली.

घरपोच सेवेने पोस्टाची वर्षभरात २८ कोटींची कमाई
मुंबई : वाहन चालक परवान्यासाठी आरटी्ओत फेऱ्या माराव्या लागत असल्याने परिवहन विभागाकडून चालक परवाना पोस्टाने घरपोच देण्याची सुविधा काही वर्षांपूर्वी सुरु केली. राज्यात सुरु झालेली ही सुविधा पोस्ट विभागाला चांगलीच फायदेशीर ठरील असून या सेवेतून वर्षभरात २८ कोटींची कमाई केली आहे. चालक परवान्याबरोबरच वाहन नोंदणी प्रमाणपत्रही घरपोच देण्याचे काम पोस्ट खात्याकडून केले जाते.
परिवहन विभागाकडून राज्यात मोठ्या प्रमाणात चालक परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणत्र दिले जातात. सुरुवातीला वाहन चालविण्याच्या परिक्षेत पास झाल्यानंतर लायसन्स मिळवण्यासाठी बऱ्याच खेटा चालकांना आरटीओत माराव्या लागत होत्या. त्यात चालकांचा बराच वेळ जात होता आणि बरीच गर्दीही आरटीओत होत होती. त्याचप्रमाणे दलालांकडूनही त्याचा गैरफायदा घेतला जात होता. यातून चालकांची सुटका करण्यासाठी चालकांना लायसन्स आणि नोंदणी प्रमाणपत्र पोस्टामार्फत घरपोच देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही सुविधा सुरु केल्यानंतर पोस्टमनला सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यात चालकांकडून चुकीचा पत्ता दिल्याने किंवा घराचा पत्ता बदलल्याने लायसन्स आणि नोंदणी प्रमाणपत्र पुन्हा पोस्टात येत होते. त्यानंतर पोस्टाकडून आरटीओमार्फत चालकांना योग्य पत्ता देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर परवाना आणि प्रमाणपत्र चालकांना योग्य पत्त्यावर मिळण्याचे प्रमाण बरेच वाढले.या सुविधेमुळे पोस्ट विभागाला चांगली कमाई करता आली आहे. एप्रिल २0१५ ते मार्च २0१६ पर्यंत ६0 लाख ८२ हजार २६४ लायसन्स आणि नोंदणी प्रमाणपत्राची बुकींग राज्यातील विविध पोस्टामार्फत करण्यात आली आहे. त्यातून तब्बल २८ कोटी ६३ लाख ७६ हजार
३२0 रुपये एवढी कमाई केल्याचे सांगण्यात आले. एक लायसन्स आणि प्रमाणपत्र घरपोच देण्यामागे ४५ रुपये आकारणी केली जाते. या आकारणीत पोस्ट फी, स्टॅम्प इत्यादीचा समावेश असतो. (प्रतिनिधी)
>१४ हजार ५३१ परवाने पुन्हा पोस्टात
२0१६ च्या जानेवारी ते मे पर्यंत ताडदेव आरटीओकडून १ लाख ६0 हजार १८२ परवाने आणि नोंदणी प्रमाणपत्र पोस्टामार्फत चालकांना त्यांच्या पत्त्यावर पाठवण्यात आले.
मात्र १४ हजार ५३१ परवाने आणि प्रमाणपत्र चालकांना मिळालेच नाहीत. चुकीचा पत्ता नमूद करण्यात आल्याने ते चालकांच्या योग्य पत्त्यावर पोहोचू शकले नसल्याची माहिती पोस्टाकडून देण्यात आली.